कोपरगावला अत्याधुनिक बंदिस्त नाट्यगृहासाठी निधी द्या - सौ. कोल्हे

स्नेहलता कोल्हे
स्नेहलता कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या कोपरगाव शहरात अत्याधुनिक वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृह उभारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान राज्यस्तर योजनेअंतर्गत कोपरगाव नगरपरिषदेला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.

याप्रसंगी दत्तूनाना कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, डॉ. मिलिंद कोल्हे, कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संजीवनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र बोरावके, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्तात्रय काले, रवींद्र पाठक, राजेंद्र सोनवणे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, शहराध्यक्ष अविनाश पाठक आदी उपस्थित होते.

कोपरगाव शहरातील आणि या परिसरातील अनेक कलाकारांनी नाट्य व कलेच्या इतर प्रकारांमध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवर मोठा नावलौकिक प्राप्त केलेला आहे. नाट्य व कला क्षेत्रात येथील कलाकारांनी उत्तुंग कामगिरी बजावली आहे. शहरात अत्याधुनिक वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृह नसल्यामुळे स्थानिक कलावंत आणि रसिकांची हेळसांड होत आहे. शहराला वैभवशाली कला व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. हा वारसा जोपासण्यासाठी आणि कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता शहरात अत्याधुनिक वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृह उभारणे गरजेचे आहे.

बंदिस्त नाट्यगृह उभारण्यासाठी अंदाजे 8 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरून भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात प्रस्ताव दाखल केलेला होता. या प्रस्तावास भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात प्रशासकीय मंजुरी मिळून 2 कोटी निधी कोपरगाव नगर परिषदेकडे वर्ग करण्यात आला होता. परंतु सदर निधी नगरपरिषद प्रशासनाने इतर कामासाठी वळवला. त्यामुळे नाट्यगृहाच्या उभारणीचे काम रखडले. अद्यापपर्यंत नगरपरिषद प्रशासनाने नाट्यगृहाच्या बांधकामाला कुठल्याही प्रकारे चालना दिलेली नाही.

बंदिस्त नाट्यगृहाअभावी स्थानिक कलावंत आणि रसिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. शहरात आधुनिक वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृह उभारले गेल्यास कलाकार व रसिकांची सोय होणार असून स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळेल. त्या दृष्टीने शहरात अत्याधुनिक वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृह उभारण्यासाठी नगर परिषदेस महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राज्य स्तर योजनेअंतर्गत आवश्यक निधी त्वरित उपलब्ध होण्यासाठी संबंधित यंत्रणेस आदेश द्यावेत, अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com