
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना सुरू झाली आहे. शेततळ्याच्या खोदकामासाठी लाभार्थ्यांना 75 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. पहिली मागेल त्याला शेततळे योजना बंद झाल्याने ही नव्याने शेततळ्याची योजना सरकारने सुरू केली आहे.
शेततळे योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांना किमान 0.60 आर म्हणजेच दीड एकर क्षेत्र असावे. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी कृषी विभागाने विकसित केलेल्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी अर्ज करू शकतात व त्यानुसार मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात संगणकीय प्रणालीद्वारे सोडतीद्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
इनलेट व आउटलेट विरहित शेततळे यासाठी आकारमान निहाय अनुदान असे- 12 बाय 15 बाय 3 मीटर आकाराच्या शेततळ्यासाठी 18621 रुपये, 20 बाय 15 बाय 3 मीटर या आकाराच्या शेततळ्यासाठी 26774 रुपये. 20 बाय 20 बाय 3 मीटर आकाराच्या शेततळ्यासाठी 38417 रुपये. 25 बाय 20 बाय 3 मीटर आकारासाठीच्या शेततळ्यासाठी 50061 रुपये. 25 बाय 25 बाय 3 आकाराच्या शेततळ्यासाठी 65194 रुपये.
30 बाय 25 बाय 3 मीटर आकाराच्या 75000 रुपये. 30 बाय 30 बाय 3 या आकारातील शेततळ्यासाठी 75000 रुपये असे अनुदान मिळणार आहे. 34 बाय 34 बाय 3 मीटर या आकारातील शेततळ्याला 75000 रुपये अनुदान मिळणार आहे. शेतकरी वर्गाने या आठ पर्यायापैकी एक पर्याय निवडून पोर्टलवर ऑनलाईन माहिती भरावी, असे आवाहन राहाता तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी केले आहे.