गुन्हा मागे न घेतल्यास राज्य पातळीवर काम बंद

इंडियन मेडिकल असोशिएशनच्या डॉक्टरांचा इशारा
गुन्हा मागे न घेतल्यास राज्य पातळीवर काम बंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा रुग्णालय अग्नीतांडव प्रकरणी आधी आरोग्य खात्याने सहा जणांना निलंबित केले आणि त्यानंतर घाई घाईत चौघांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली. ही कारवाई मागे घ्यावी, यासाठी गुरूवारी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी जिल्हा काम बंद आंदोलन केले. गुन्हे मागे न घेतल्यास इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांच्या वतीने राज्य पातळीवर काम बंद इशारा देण्यात आला असून वेळ पडल्यास अत्यावश्यक रुग्णसेवाही बंद करण्याचा विचार सुरु असल्याचे संघटनेचे सचिव डॉ. सचिन वाहडणे यांनी सांगितले.

दरम्यान, गुरूवारी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात झालेल्या निषेध सभेत आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे यांनी अग्नीतांडव प्रकरणी डॉक्टर आणि तीन परिचारीका यांना बळीचा बकरा करण्यात आल्याचा आरोप केला आहे. डॉ. आठरे म्हणाले, डॉक्टर आणि परिचारिका या रुग्णांवर उपचार करत असतात. ही सेवा देत असताना त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही अन्य प्रशासकीय यंत्रणांची आहे. रुग्णालयाला आग लागल्यानंतर अग्नीशमन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, इलेक्ट्रिकल विभाग यांच्यामार्फत गेल्या काही कालावधीत तपासण्या, ऑडिट केलेले आहे का? हे तपासणे गरजेचे आहे.

रुग्णांवर उपचार करतांना त्यात हालर्गीपणा झाल्यास संबंधीतांना जबाबदार धरावे, मात्र, सारखे प्रकार घडल्यानंतर ज्या विभागाने त्यांची बांधणी केलेली आहे, अन्य विभागाने केलेल्या कामाची चौकशी सोडून डॉक्टर आणि परिचारिका यांच्यावर कारवाई करणे चुकीचे आहे. केवळ मृतांच्या नातेवाईकांच्या आणि प्रसार माध्यमाच्या समाधानासाठी घाईघाईत चुकीची कारवाई करणे बरोबर नाही. गेली दीड वर्ष स्वत:ची आपल्या कुटुंबाची पर्वा न करता आरोग्य सेवा देणार्‍या डॉक्टर आणि परिचारीकांवर मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करणे क्लेशदायक असल्याचे डॉ. आठरे म्हणाले. यामुळे दाखल गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, यासाठी आंदोलन करण्यात आले असून त्याची दखल न घेतल्यास राज्य पातळीवर आंदोलन करण्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या देण्यात आला. यावेळी शहरातील डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नोबल फाऊंडेशनने खासगी हॉस्पिटलप्रमाणेच लाखो रुपयांतून दर्जेदार साहित्य वापरून संबंधित आयसीयू उभे केले होते. मोठ्या संख्येने रुग्णांना त्या ठिकाणी जीवन दान मिळालेले आहे. अशा आयसीयूमध्ये अग्नीतांडव झाल्याने मोठे दु:ख झाल्याचे डॉ. बापूसाहेब कांडेकर यांनी सांगितले. तसेच जळालेले आयसीयू पुन्हा उभे करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com