
शेवगाव | शहर प्रतिनिधी
तालुक्यात कांदा (onion) काढणीस सुरुवात झाली आहे. मात्र वाढलेली मजुरी आणि उतरलेले भाव यामुळे उन्हाळी कांदा शेतक-यांसाठी (farmers) निराशजनक ठरण्याची चिन्हे आहेत.
तालुक्यात विशेषत: तालुक्याच्या पश्चिमेकडील भागात गेल्या १ ते २ वर्षापासुन कांदा लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. चांगल्या पावसामुळे पाण्याची उपलब्धता वाढली. तसेच विविध नद्यावरील बंधा-यामुळे वाढलेली पाणी पातळी व मुळा धरणाच्या आवर्तनामुळे उपलब्ध झालेल्या पाण्यामुळे कांदा पिकास शेतकरी पसंती देवू लागले आहेत.
तालुक्यातील आव्हाणे, वाघोली, ढोरजळगाव, वडुले, भातकुडगाव, मळेगाव, सामनगाव, लोळेगाव, आखतवाडे, गरडवाडी, निंबेनांदुर आदी भागात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. कृषी विभागाच्या माहिती नुसार तालुक्यात जवळपास साडे दहा हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली असून सध्या विविध परिसरात कांदा काढणीस आला आहे.
एकरी ८ ते १० हजार रुपयापर्यंत काढणीचा दर गेला आहे. कांद्याची लागवडीपासून फवारण्या व इतर मशागतीमुळे आधीच शेतक-यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. आता वाढलेल्या मजुरीचा सामना करण्याची कांदा उत्पादक शेतक-यावर वेळ आली आहे.
सध्या उत्पादन चांगले आले असले तरी कांदा बाजारात येणाऱ्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे कांद्याचे दर मात्र प्रति क्विंटल ११०० ते १५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे अनेक शेतक-यांनी कांदा साठवणीवर भर दिला आहे.
कांदा काढणीसाठी गावोगावी मजुरांच्या कार्यरत असलेल्या टोळ्यांनी उच्चांकी तापमान व उन्हाच्या काहिलीमुळे कामाच्या वेळेत केला असून सकाळी ७ ते १२ यावेळेत काधानीचे काम करून उन टाळण्यासाठी दुपार नंतर काम थांबविले जात आहे.
मात्र शेतक-यांना मजुरीचे हे वाढते दर परवडत नाही. त्यामुळे त्यांची घरातील इतर सदस्यांच्या मदतीने भर उन्हां तान्हात कांदा काढणीसाठी लगबग सुरु असल्याचे चित्र ठीकठिकाणी दिसत आहे. एकंदरीत दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेच्या सावटात असल्याचे चित्र दिसत आहे.