त्रिपुरा येथील घटनेचा श्रीरामपुरात निषेध

वॉर्ड नं. 2 मध्ये कडकडीत बंद || ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे तहसीलदारांना निवेदन
त्रिपुरा येथील घटनेचा श्रीरामपुरात निषेध

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

स्थानिक निवडणुकीत आपले राजकिय हित साध्य करू पाहत असलेल्या काही जातियवादी शक्तींनी त्रिपुरा राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुस्लिम समुदायास टार्गेट करत त्रिपुरा राज्यात धुडगूस घातला आहे. काही जातियवादी पक्ष, संघटनेच्या माध्यमातून मुस्लिमांचे धार्मिक स्थळे मस्जिद, मदरसे आणि घरांवर नियोजित पद्धतीने हल्ले केले जात असल्याच्या निषेधार्थ येथील ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्यावतीने जिल्हाध्यक्ष फयाजभाई बागवान तथा अ‍ॅड. हारुन बागवान यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती, भारत सरकार यांच्या नावे असलेले निवेदन श्रीरामपूर तहसीलदारांना देण्यात आले. तसेच वॉर्ड नं. 2 मध्ये याच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला.

त्रिपुरा राज्यातील काही जातियवादी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकांना इस्लाम धर्मियांच्या विरोधात भडकविण्याचे काम केले तथा त्रिपुरा राज्यात सर्वत्र भारतीय दंड संहिता कलम 144 लागू असताना देखील वरील काही जातियवादी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आपल्या समर्थकांसह मोर्चा काढून इस्लाम धर्माचे संस्थापक आणि मुस्लिमांविरोधी घोषणा देत अर्वाच्य भाषेत वक्तव्य करून सामाजिक शांतता भंग करत मुस्लिम धर्मियांचे प्रार्थना स्थळ असलेले मस्जिद, मदरशांमध्ये तोडफोड केली.

लोकशाहीच्या राज्यात प्रत्येकाला आपापल्या धर्माचे आचरण करण्याचा पूर्णतः अधिकार आहे. मात्र लोकशाही नकोशी असलेली काही जातियवादी संघटना देशात अराजकता माजविण्याचे मनसुबे रचून सामाजिक शांतता भंग करू पाहत आहे म्हणून वरील जातीयवादी संघटनांवर तथा त्या संघटनेच्या जातियवादी पदाधिकार्‍यांवर घटनेतील तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता कलम 153, 153 इ, 294, 295 , 188, 171, 147, क्रिमीनल अ‍ॅक्ट, रासुका, गुंडा ऐक्ट.120 इ,124 -,ण-झ- नुसार योग्य आणि कडक कारवाई करण्यात यावी सोबतच अशा जातीयवादी संघटनेवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, मुस्लिमांना पुरेसे संरक्षण देण्यात यावे, झालेल्या नुकसानीची शासनस्तरावरून भरपाई देण्यात यावी, आदी मागण्या करत लोकशाहीचे हित संवर्धन राखण्यास अपयशी ठरलेल्या त्रिपुरा सरकारला त्वरित बरखास्त करण्यात यावे, अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

या निवेदनावर ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष हाजी फय्याज बागवान, अ‍ॅड. हारुण बागवान, आरीफ कुरेशी, शौकत शेख, जाकिर शहा, अजिज अत्तार, शकील शेख, मुजम्मील शेख, नासिर शेख सरदार (राजूभाई) कुरेशी तथा पत्रकार सुनील शिरसाठ, लक्ष्मीकांत शर्मा आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com