प्रोत्साहन अनुदान वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू

जिल्हा बँकेने अद्याप लाभार्थी नावेच पोर्टलवर भरली नाहीत
प्रोत्साहन अनुदान वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू

पिंपरी निर्मळ |वार्ताहर|Pimpri Nirmal

राजकीय सारीपाटाच्या ओढातानीत अल्पमतात आलेल्या आघाडी सरकारने गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजने अंतर्गत नियमीत कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांसाठी 50 हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान वाटपास मंजुरी दिल्याची घोषणा केली आहे. मात्र कायमच कागदोपत्री मागे असलेल्या जिल्हा बँकेने याही वेळेस सभासदांची माहिती अद्याप ऑनलाईन केलेली नसल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांना या योजनेतून लाभ मिळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून नियमीत कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना भरणा केलेल्या कर्ज रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. गेल्या 11 मार्च रोजीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यानी योजनेची घोषणा करून 10 हजार कोटीची तरतुदही केली आहे. यासाठी जिल्हा बँकेने परिपत्रक काढीत 2017-18, 2018-19 व 2019-20 या तिनही वर्षात पीक कर्जाची उचल करून मुदतीत परतफेड केलेली आहे अशा शेतकर्‍याची तिन वर्षाची कर्ज उचल व भरणा माहिती, आधार नंबर सेव्हींग खाते आदी माहिती मागविण्यात आलेली होती.

जिल्हा बँकेच्या अखत्यारीत येणार्‍या सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून ऑफलाईन माहिती संकलीत करण्यात आली आहे. मात्र ही माहिती संगणकीय प्रक्रियेसाठी ऑनलाईन करावयाची आहे. त्यांनतर पात्र लाभार्थी शेतकर्‍यांच्या बचत खात्यावर त्यांच्या कर्ज व्यवहाराप्रमाणे प्रोत्साहन अनुदानाचे वाटप होणार आहे. सध्या राज्यातील आघाडी सरकारची स्थिती अस्थिर झालेली आहे. याही परिस्थितीमध्ये शेतकर्‍यांना मदत व योजनेची अंमलबजावणी व्हावी यासाठी सरकारने गेल्या कॅबिनेट बैठकीत हा निधी वाटपास मंजुरी दिली आहे. मात्र कायमच कागदोपत्री मागे असलेल्या जिल्हा बँकेने याही वेळेस सभासदांची माहीती अद्याप ऑनलाईन पोर्टलवर भरलेली नसल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांना या योजनेतून लाभ मिळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.

एकट्या राहाता तालुक्यात सव्वाचार हजार लाभार्थी

जिल्हा बँकेने नियमीत सभासदांची माहिती सेवा सोसायट्यांकडून मागितली आहे. यानुसार जिल्हा बँक व सेवा सोसायट्यांच्या अखत्यारितील राहाता तालुक्यातील 4 हजार 300 पात्र शेतकर्‍यांची माहिती बँकेने तयार केली आहे. मात्र अद्याप ही माहिती पोर्टलवर ऑनलाईन भरण्यात आलेली नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com