जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे महाराष्ट्र दिनी उद्घाटन

महसूलमंत्री थोरात ; जिल्हाधिकार्‍यांसमवेत पाहणी
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे महाराष्ट्र दिनी उद्घाटन

अहमदनगर (प्रतिनिधी) -

शहरात सुरू असलेल्या नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र दिनी करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. मंत्री थोरात आणि मंत्री शंकरराव गडाख हे काल शहरात आले असता त्यांनी संयुक्तपणे या इमारतीची पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जे. डी. कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पवार, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यावेळी उपस्थित होते.

प्रशासकीयदृष्ट्या सर्वाधीक महत्त्वाच्या असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाची नूतन इमारत पूर्णत्वाच्या मार्गावर असून येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी त्याचे सर्व काम पूर्ण होऊन उद्घाटन करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मंत्री थोरात यांनी दिली. इमारतीची पाहणी करताना मंत्री थोरात यांनी प्रत्येक मजला पाहिला अन् कामाचे स्वरुप आणि दर्जा, प्रलंबित कामांसाठी लागणारा वेळ, त्यासाठी आवश्यक असणार्‍या बाबी आदींची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि अधीक्षक अभियंता कुलकर्णी यांच्याकडून घेतली. प्रलंबित कामे लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री थोरात यांचेच योगदान

मागील काळात थोरात हे महसूलमंत्री असताना या नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारत बांधकामास मंजुरी मिळून त्याची सुरुवात झाली होती. सुरुवातीच्या टप्प्यात 28 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, मधल्या काळात इमारत बांधकाम थंडावले होते. ते काम आता जवळपास पूर्णत्वास गेले असून इमारतीतील फर्निचर तसेच इतर अनुषंगिक कामे सुरू आहेत. त्यासाठीचा आवश्यक निधीही उपलब्ध होऊन महाराष्ट्र दिनापर्यंत सर्व बाबींची पूर्तता होईल आणि नवीन अत्याधुनिक, देखणे असे जिल्हाधिकारी कार्यालय तयार होईल, असा विश्वास मंत्री थोरात यांनी यावेळी व्यक्त केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com