राहुरी तालुक्यातील उसाच्या पट्ट्यात फुललाय कांद्याचा मळा

कांद्याचे विक्रमी उत्पादन; चाळीतील कांद्यावर ठकसेन व्यापार्‍यांचा डोळा
राहुरी तालुक्यातील उसाच्या पट्ट्यात फुललाय कांद्याचा मळा

उंबरे (वार्ताहर) - राहुरी तालुक्यामध्ये उसाच्या पट्ट्यात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. तालुक्यात उत्पादन वाढले असले तरी लॉकडाऊनमुळे शेतीमालाला भाव नसल्याने कांदा कवडीमोल भावात विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. काही शेतकर्‍यांनी मात्र, कांद्याची विक्री न करता कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. मात्र, आता पावसाळ्याची चाहूल लागल्याने शेतकर्‍यांच्याही तोंडचे पाणी पळाले आहे.

बागायती पट्टा आणि उसाचे आगार म्हणून ओळखल्या जाणार्‍या उंबरे, ब्राम्हणी, चेडगांव, मोकळ ओहळ, कुक्कडवेढे, केंदळ, शिलेगाव, पिंपरी अवघड या परिसरामध्ये सर्वात जास्त उसाचे क्षेत्र आहे. जिल्ह्यातील सर्वच साखर कारखानदारांमध्ये या पट्ट्यातून शेतकर्‍यांचा ऊस उचलण्यासाठी स्पर्धा निर्माण होते. अनेक वेळा कारखानदारांनी या तालुक्यातून विशेषतः या परिसरातून जास्तीत जास्त ऊस उचलला आहे. कारखान्याने शेतकर्‍यांना चांगले बाजारभाव दिले तर काही कारखान्याकडून अजून शेतकर्‍यांची येणे बाकी आहे. अशी परिस्थिती असताना मात्र, शेतकर्‍यांनी यावर्षी उसाच्या शेतीला रामराम ठोकून कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करून उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले आहे. अशा परिस्थितीमध्ये उत्पादन वाढले, परंतु करोनासारख्या महाभयंकर आजाराने सर्वच लॉकडॉऊनच्या कचाट्यात सापडल्यामुळे शेतकर्‍यांनी आपला कांदा साठवून ठेवला आहे. त्यामुळे मार्केटमध्येही सध्या कांदा विक्री कमी प्रमाणात आहे. कांदा काढणीच्या वेळेस मजुरांनी चढ्याभावाने कांदा काढणी केली. यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला होता.

शेतकर्‍यांचा नाइलाज झाल्यामुळे त्यांना मजूर मागेल ती किंमत मोजावी लागली. सध्या कांदा मोठ्या प्रमाणात आहे. अनेक वेळा शेतकरी बांधावर काही व्यापार्‍यांना कांदा विकतात. अनेक व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांना वेळेवर पैसे दिले. परंतु काही अनाधिकृत व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांना ज्यादा भावाचे आमिष दाखवून कांदा मोठ्या प्रमाणात खरेदी केला. परंतु काहींना थोडेफार पैसे देऊन शेतकर्‍यांचा विश्‍वास संपादन केला. त्यामुळे शिवार फेरीत कांद्याला महत्त्व प्राप्त झाले. याचा फायदा काही व्यापार्‍यांनी घेतला. कांदा मोठ्या प्रमाणात खरेदी करून व्यापार्‍यांनी त्याची विल्हेवाट लावली. सुरूवातीला काही शेतकर्‍यांना थोडेथोडे पैसे व्यापार्‍यांनी दिले. त्यामुळे व्यापारी पैसे देतात, असा शेतकर्‍यांचा भ्रम झाला. शेतकर्‍यांना व्यापार्‍यांनी चेक दिले तर काहींचा तोंडी बोलीवरती कांदा खरेदी केला. राहुरी तालुक्यातून अनेक शेतकर्‍यांना व्यापार्‍याकडून कांद्याच्या पैशात बुडवणूक झाली. कोट्यवधी रुपये शेतकर्‍यांचे बुडाल्यामुळे काही व्यापार्‍यांनी या परिसरातून पोबारा केला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. असे असताना यावर्षी तरी शेतकर्‍यांनी सावध होऊन बाजार समितीमध्ये कांदा विक्री करावी, शिवार फेरीवरती कांदा विकला तर व्यापार्‍यांकडून पैसे मिळतीलच याची शाश्‍वती नाही. शेतकर्‍यांना मागचा पैसे बुडविण्याचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे आता शेतकरी वेळीच सावध झाल्याचे चित्र आहे.

Related Stories

No stories found.