राहुरी (प्रतिनिधी) -

राहुरी तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी काल उमेद्वारी अर्ज माघारीच्या दिवशी 501 उमेदवारांनी आपआपले अर्ज

माघारी घेतल्याने 863 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून पैकी 52 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. काही उमेदवारांनी गावपुढार्यांसमोर बंडाचा झेंडा फडकवून आपली उमेदवारी शाबूत ठेवली. त्यामुळे अनेक गावपुढार्यांना अर्ज माघारीसाठी उमेदवारांची मनधरणी करावी लागली. तर मुदत संपल्यानंतर अर्ज माघारी घेण्यासाठी आलेल्या महिला उमेदवाराच्या अर्जावरून दोन गट आमनेसामने येऊन पोलिसांबरोबर चकमक उडाली.

सध्या राहुरी तालुक्याच्या ग्रामीण भागात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अर्ज माघारीच्या दिवशी गाव पुढार्यांना अपक्ष अर्जदारांच्या पायघड्या घालताना नाकीनऊ आले. एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. सर्वच ठिकाणी दुरंगी लढत असून कोळेवाडी ग्रामपंचायतीमध्ये वंचित बहुजन आघाडीने पॅनल उभा करीत तिरंगी लढत निर्माण केली आहे.

राहुरी तालुक्यातील वांबोरी, उंबरे, अंमळनेर, आंबी, बाभूळगाव, चांदेगाव, चेडगाव, चिंचाळे, चिंचविहीरे, दवणगाव, धानोरे, गणेगाव, गुहा, गुंजाळे, जांभळी, जांभूळबन, वावरथ, कणगर खुर्द, करजगाव, कात्रड, केंदळ बु., केसापूर, खडांबे बु, कोळेवाडी, कोपरे, शेनवडगाव, कुक्कढवेढे, कुरणवाडी, लाख, मल्हारवाडी, पाथरे खु, पिंपळगाव फुणगी, पिंप्री अवघड, राहुरी खुर्द, रामपूर, संक्रापूर, सात्रळ, तांभेरे, तांदूळनेर, तिळापूर, वडनेर, वळण, वांजूळपोई, वरशिंदे, वरवंडी या गावातील ग्रामस्थांची तोबा गर्दी महसूल आवारात दिसून आली. बिनविरोध झालेल्या सदस्यांनी महसूल आवारातच गुलाल उधळल्याचे चित्र होते. तर सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणूक मंडपासमोर गाव पुढार्यांचे अपक्ष उमेदवारांपुढे लोटांगण सुरू होते. काहींनी गाव पुढार्यांचा शब्द न पाळल्याने शाब्दीक चकमकही दोन ते तीन ठिकाणी उडाल्याचे दिसून आले.

उंबरे ग्रामपंचायतीसाठी काही उमेदवार तीन वाजेनंतर अर्ज माघारीसाठी हजर झाले. यावेळी अधिकार्यांनी अर्ज माघार घेण्यास नकार दिल्याने गावपुढार्यांची व अधिकार्यांची शाब्दीक चकमक उडाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत राहुरी महसूल कार्यालयामध्ये गर्दी होती.