69 गावांतील 198 शाळा करोनामुळे सुरू होणे अशक्य
File Photo

69 गावांतील 198 शाळा करोनामुळे सुरू होणे अशक्य

कोविड प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सोमवारपासून (दि.4) जिल्ह्यात ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरात आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होत आहेत. यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक विभागाची लगबग सुरू असताना 10 तालुक्यातील 69 गावात करोना संसर्गामुळे प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेले आहे. या गावात जिल्हा परिषदेच्या 109 तर अन्य व्यवस्थापनाच्या 89 शाळा आहेत. अशा या 198 शाळा करोना संसर्ग कमी झाल्याशिवाय सुरू होवू शकणार नाहीत, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.

राज्यातील अन्य जिल्ह्यात करोनाचा संसर्ग कमी होत असतांना नगर जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून 500 ते 900 च्या दरम्यान दररोज करोनाचे रुग्ण सापडत आहे. गेल्या काही दिवसांपासून काही गावांत मोठ्या संख्याने करोनाचे रुग्ण सापडत असल्याने त्या ठिकाणी सात ते चौदा दिवसांचा बंद पाळण्यात येत असून त्या गावांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. दरम्यान जिल्ह्यात पाचवी ते बारावीपर्यंतच्या 2 हजार 122 शाळा असून गुरूवारी जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्रात असणारी गावे आणि शाळांची आकडेवारी शिक्षण विभागाने संकलित केली.

यात 14 पैकी 10 तालुक्यात 69 गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. जिल्हा परिषदेच्या 109 तर अन्य व्यवस्थापनाच्या 89 शाळा आहेत. अशा या 198 शाळा करोना संसर्ग कमी झाल्याशिवाय सुरू होवू शकणार नाहीत. करोनामुळे सर्वाधिक प्रतिबंधित क्षेत्रात असणारी गावे ही संगमनेर तालुक्यात 24 असून पारनेर तालुक्यात 12 आणि श्रीगोंदा तालुक्यात 11 आहेत. तर अकोले, राहुरी, पाथर्डी आणि जामखेड तालुक्यातील एकही गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेले नाही.

बाधित गावे आणि कंसात सुरू न होणार्‍या शाळा

संगमनेर तालुका 24 गावे (71 शाळा). कोपरगाव 1 गावे (1), राहाता 7 गावे (24 शाळा), श्रीरामपूर 2 गावे (16 शाळा), नेवासा 2 गावे (22 शाळा), शेवगाव 4 गावे (22 शाळा), कर्जत 2 गावे (2 शाळा), पारनेर 12 गावे (20 शाळा), श्रीगोंदा 11 गावे (18 शाळा), नगर 4 गावे 2 शाळा).

Related Stories

No stories found.