
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश मूर्तींचे विसर्जन केल्या जाणार्या विहिरींची स्वच्छता, विहिरींवरील जाळ्यांची दुरूस्ती करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिले आहेत. येत्या दोन दिवसांत महापालिकेकडून काम सुरू करण्यात येणार असल्याचे शहर अभियंता सुरेश इथापे यांनी सांगितले.
महापालिकेकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गावर खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. तसेच गणेश मंडळांना परवानगीसाठी अतिक्रमण निर्मूलन विभागात कक्ष कार्यान्वित झालेला आहे. आता शहरातील गणेश मूर्तींचे विसर्जन केल्या जाणार्या नेप्ती रोडवरील बाळाजी बुवा विहीर व पाईपलाईन रोडवरील यशोदानगर विहिरीची स्वच्छता व त्यावरील जाळ्यांच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत हे काम सुरू करण्यात येणार असल्याचे इथापे यांनी सांगितले.
विसर्जन स्थळी छोट्या मूर्तींसाठी व शाडूच्या मूर्तींसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. निर्माल्य टाकण्यासाठी स्वतंत्र वाहने व कुंड्या तैनात केल्या जातील. काही ठराविक ठिकाणी कृत्रिम हौद तयार करण्याचेही नियोजन असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, पोलीस प्रशासनाकडूनही बंदोबस्ताच्या दृष्टीने गणेश मूर्तींचे विसर्जन होणार्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली होती. विसर्जन स्थळी बॅरिकेट व विहिरींवरील जाळ्यांची दुरूस्ती करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाकडून महापालिकेला देण्यात आल्या आहेत.