...अन्यथा पालिकेने कर आकारणी करू नये

चाणखन बाबा ते 15 चारी रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा
...अन्यथा पालिकेने कर आकारणी करू नये

राहाता |वार्ताहर| Rahata

नगरपालिका हद्दीतील चाणखन बाबा ते पंधरा चारी या दुर्लक्षित झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित करण्यात यावे अशी मागणी या भागातील रहिवासी नागरिकांनी निवेदनाद्वारे पालिकेचे प्रशासक चंद्रकांत चव्हाण यांच्याकडे केली आहे.

मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. मात्र राहाता शहरातील चाणखन बाबा ते 15 चारी या रस्त्याची दुरुस्ती कधीही झाली नाही. हा परिसर कायम अविकसित व दुर्लक्षित राहिलेला आहे. आजपर्यंत पालिकेने येथील रहिवासी नागरिकांकडून घरपट्टी व पाणीपट्टी यांची वसुली करून या परिसरात रस्ते दळणवळण. आरोग्य व स्वच्छता बाबत कधीही लक्ष दिले नाही. त्यामुळे राहाता शहरात जाण्या-येण्यासाठी या भागातील नागरिकांना नेहमीच खडतर रस्त्याचा सामना करावा लागला आहे. सध्याचे पालिकेचे नव्याने रुजू झालेले प्रशासक व मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करून या परिसरातील नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनाही या निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आलेले आहेत. मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर आप्पासाहेब लांडगे, संतोष मुतडक, राजेंद्र लांडगे, सत्यम सदाफळ, प्रवीण मुरादे, साई लांडगे, मच्छिंद्र लांडगे, अण्णासाहेब सदाफळ, बाळासाहेब सदाफळ, सचिन बोठे, राजेश दरंदले, ऋषिकेश सदाफळ, विजय पोकळे, कार्तिक लांडगे, दिनेश लांडगे, संकेत लांडगे ,भाऊसाहेब नाईकवाडे, अभिजीत बोठे, किरण लांडगे, महेश मुरादे, विजय सदाफळ, गोरख सदाफळ, संजय शेळके, सुबोध बोठे, कचेश्वर बोठे, शरद सोनवणे, योगेश सोनवणे यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

चाणखनबाबा ते 15 चारी या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून गेल्या पंचवीस वर्षापासून नगरपरिषदेने या रस्त्याकडे दुर्लक्षितपणा केल्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून जाण्या-येण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात रहिवासी नगरपरिषदेला नियमितपणे कर भरतात. तरीही प्रशासन या परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देत नाही. प्रशासनाकडून रस्त्याची दुरुस्ती होत नसेल तर या परिसरातील नागरिकांकडून नगरपरिषदने कर आकारणी करू नये.

- बाबासाहेब लांडगे, राहाता

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com