बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी घुलेवाडीच्या सॉ मीलवर कारवाई
सार्वमत

बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी घुलेवाडीच्या सॉ मीलवर कारवाई

Arvind Arkhade

संगमनेर|शहर प्रतिनिधी|Sangmner

बेकायदेशीर वृक्षतोड केल्याप्रकरणी घुलेवाडी परिसरातील सॉ मील या लाकडाच्या वखारीवर वनखात्याने काल कारवाई केली.

तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड सुरू आहे. आंबा, लिंब या झाडाला तोडण्याची परवानगी नसतानाही या वृक्षाची कत्तल केली जात आहे. घुलेवाडी परिसरातील एका सॉ मील मध्ये आंबा व लिंब ही झाडे तोडून आणल्याची माहिती वनखात्याला मिळाली ही महिती मिळताच वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी या वखारीमध्ये गेले.

वखारीची पाहणी केली असता या ठिकाणी बेकायदेशीर रित्या आणलेली आंब्याचे व लिंबाच्या झाडाचे ओंडके आढळले. सदर मील मुळ मालकाने करारावर एकास चालविण्यासाठी दिली आहे. बेकायदेशीर वृक्ष तोडीबाबत सखोल चौकशी केल्यानंतर संबंधित मीलवर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वनखात्याचे अधिकारी श्री. माळी यांनी दिली आहे.

मीलला सील कधी ?

संगमनेर तालुक्यातील अनेक वखारीमध्ये लाकडाचा बेकायदेशीर व्यापार चालतो घुलेवाडी येथील सॉ मील वर काल झालेल्या या कारवाईमुळे चोरी उघडकीस आली आहे. वन खात्याच्या अधिकार्‍यांनी या चोरीला दुजोराही दिला आहे. बेकायदेशीर वृक्षतोड करणार्‍या वखारी सील करण्याचा अधिकार वनखात्याला आहे.

घुलेवाडी येथील वखारही सील होण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकार्‍यांना विचारले असता सर्व चौकशी करण्यात येईल, त्यानंतर पुढील कारवाई केली जाई असे त्यांनी सांगितले. या वखारीसोबतच इतरही वखारी वनखाते सील कधी करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

Deshdoot
www.deshdoot.com