मिरीतील अवैध धंदे बंद

मिरीतील अवैध धंदे बंद

करंजी (वार्ताहर) -

पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे येथील काही ग्रामस्थांनी जिल्हा

पोलीस अधिक्षकांकडे केली होती. यासंदर्भातले सविस्तर वृत्त ‘सार्वमत’ने प्रसिद्ध करताच दुसर्‍याच दिवशी मिरी येथील सर्व अवैध धंदे पोलिसांकडून बंद करण्यात आल्याने सर्वसामान्यांकडून देखील याबाबत समाधान व्यक्त करत सार्वमतलाही धन्यवाद दिले आहेत.

मिरी येथे चोर्‍यांचे प्रमाण वाढल्याने व रात्रीच नव्हे तर भरदिवसा देखील या गावात घरफोड्या होऊ लागल्याने हे सर्व प्रकार अवैध धंद्यांमुळेच होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे गावातील सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.

या संदर्भातले वृत्त सविस्तर प्रसिद्ध होताच पाथर्डी व मिरी येथील पोलीस खडबडून जागे झाले व त्यानंतर त्यांनी मिरी गावात खुलेआमपणे सुरू असलेले चक्री मटका, जुगार, अवैध दारू विक्री व इतर अवैध धंदे बंद केले आहेत. आता हे अवैध धंदे कायमचे बंद होतात की पुन्हा कोणाच्या आशीर्वादाने हळूहळू सुरू करण्याचा प्रयत्न होतोय. याकडे देखील तक्रारदार ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मिरी येथे चक्रीसारखा ऑनलाईन मटका मोठ्या प्रमाणात सुरू होता. गावातील तरुण या चक्राच्या चक्रव्यूहात अडकल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परंतु गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येऊन हे सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे पोलीस अधिक्षकांकडे केल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी देखील पाथर्डी पोलिसांना या अवैध धंद्यावरून चांगलीच समज दिली असल्याची माहिती समजली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com