गोदावरी नदीपात्रातील बेकायदा उपशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष - चव्हाण

गोदावरी नदीपात्रातील बेकायदा उपशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष - चव्हाण

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

गोदावरी नदीपात्रात अनेक ठिकाणी पात्र उघडे पडल्यामुळे वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळूचा उपसा सुरु केला आहे.

वाळूच्या उपशाकडे राहात्याच्या महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. बेकायदा वाळूचा उपसा तातडीने बंद झाला नाही तर पुणतांबा ग्रामस्थांच्यावतीने धडक आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस सेवा दलाचे उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी दिला.

जुलै 2020 पासून गोदावरी नदी दुथडी भरून वाहत होती. जानेवारी 2021 पर्यंत गोदावरी नदी पात्रात पाणी वाहत होते. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू असल्याचे समजते. वाळूच्या लिलावाबाबत निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र नदीपात्रात पाणी असल्यामुळे वाळूचा किती साठा असेल याचा अंदाज येत नाही. ही सबब सांगून काही ठिकाण लिलाव झाले नाहीत. मात्र आता पाणी कमी झाल्यामुळे वाळू तस्करांनी बेकायदा वाळूचा उपसा सुरु झाला आहे.

वाळूची बेकायदा वाहतूक करण्यासाठी वाळू तस्करांनी खास रस्ते तयार केले आहेत. योगीराज चांगदेव महाराज समाधी मंदिराजवळ असलेल्या रेल्वे खात्याने गोदावरी नदीवर बांधलेल्या पुलाखालून सुद्धा वाळू तस्करांनी बेकायदा वाळूची वाहतूक सुरु केली आहे.

पुणतांबा येथील महसूल विभागाचे अधिकारी पुणतांबा गावात वास्तव्यास राहत नसल्यामुळे वाळू तस्कराकडून बिनबोभाट वाळू तस्करी केली जात आहे. त्यातच गोदावरी नदीपात्रातील नाऊर, नायगाव, मातुलठाण येथूनही वाळूचा उपसा करत वाळूची वाहतूक पुणतांबा मार्गे केली जात आहे.

तेथे वाळूच्या उपशाबाबत निविदा काढल्याची चर्चा असली तरी रात्रंदिवस यांत्रिक साधनामार्फत वाळूचा उपसा कसा केला जातो याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नियमांची पायमल्ली केली जात असेल तर महसूलच्या अधिकारी वर्गाने कडक कारवाई करावी तसेच बेकायदा वाळूचा उपसा तातडीने बंद झाला नाही तर धडक आंदोलन करण्याचा इशाराही श्री. चव्हाण यांनी दिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com