अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने पकडली

तहसीलदार प्रशांत पाटील यांची कारवाई
अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने पकडली

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

गोवर्धन परिसरातील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍यांवर वाळू तस्करांविरूद्ध तहसीलदार प्रशांत पाटील यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. तहसीलदार पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी सोमवारी दि. 9 रोजी अचानक छापेमारी करत अवैध वाळू वाहतूक करणारी 5 वाहने पकडली.

तहसीलदार प्रशांत पाटील, मंडल अधिकारी वायखिंडे, तलाठी हेमंत डहाळे, अविनाश तेलतुंबडे, संतोष लाचोरे आदींच्या पथकाने गोवर्धनपूर परिसरात धाडी मारल्या.मात्र याची कुणकुण लागताच वाळू वाहतूक करणारी वाहने अंधारात लपवली. एक वाहन पकडण्यात पथकाला यश आले.मात्र ग्रामस्थांनी गावातील नागरिकांच्या मदतीने अंधारात लपवून ठेवलेली चार वाहने ताब्यात घेण्यात आली. तलाठी प्रवीण सुर्यवंशी, अरुण हिवाळे, कुणाल काळे आदींनी वाहने चालवीत आणून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.

गोवर्धन परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वाळू तस्कर वेगवेगळया ठिकाणांहून बेकायदा वाळू वाहतूक करत आहेत. या वाहतुकीवरून अनेकदा ग्रामस्थ आणि वाळू तस्करांमध्ये धुमश्चक्री होते नव्हे तर वाळूवरून मोठ्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी सराला गोवर्धन येथील ग्रामस्थ व वाळू तस्करांमध्ये वाद झाला होता. या टोळयांमध्येही अनेकदा मारामारीच्या घटना घडल्या आहेत.

एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याच्या शर्यतीत अनेकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री तहसीलदार प्रशांत पाटील यांनी धडक कारवाई करत 5 अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने पकडली. ही वाहने जप्त करण्यात आली आहेत.

Related Stories

No stories found.