
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
कोरडगाव ते पाथर्डी रस्त्याने अवैध वाळू वाहतूक करणार्या वाहनांविरूध्द स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करून आठ ब्रास वाळू व दोन डंपर असा एकूण 20 लाख 80 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पाच जणांविरूध्द पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. पोलीस अंमलदार शिवाजी ढाकणे यांनी फिर्याद दिली आहे.
विजय अशोक चेमटे (वय 32 रा. शिंगोरी थाटेवडगाव रोड, ता. शेवगाव), गजेंद्र रघुनाथ भराट (वय 19 रा. तोंडोळी, ता. पाथर्डी), केशव रूस्तुम चेमटे (रा. शिंगोरी, ता. शेवगाव), तौफिक नदीम शेख (वय 26 रा. मुंगी, ता. शेवगाव), सुधीर संभाजी शिरसाठ (पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व वाहतुकी विरूध्द विशेष मोहिमेचे आयोजन करून कारवाई करणे बाबतचे आदेश दिले आहेत.
नमुद आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार मनोजर शेजवळ, दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, शंकर चौधरी, संतोष लोढे, सचिन आडबल, विशाल दळवी, संदीप दरदंले, ज्ञानेश्वर शिंदे, ढाकणे, विनोद मासाळकर, रवींद्र घुंगासे, मच्छिंद्र बर्डे, सागर ससाणे, जालिंदर माने, रोहित येमुल, योगेश सातपुते, भागचंद बेरड व अर्जुन बडे यांचे पथक पाथर्डी तालुक्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकी विरूध्द कारवाई करणे करीता गस्त करत होते. यादरम्यान दोन डंपरमध्ये चोरून वाळू भरून कोरडगाव कडुन पाथर्डीकडे वाहतूक करणार आहेत, अशी माहिती निरीक्षक कटके यांना मिळाली होती.
त्यांनी लागलीच पथकास कळवून पाथर्डी पोलीस ठाणे अंमलदार व पंचांना सोबत घेऊन खात्री करून कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या. नमुद सुचना प्रमाणे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पाथर्डी ते कोरडगाव रोडने जाऊन तनपुरवाडी शिवारात मोहटादेवी फाटा येथे रोडवर सापळा लावुन थांबलेले असताना पथकास कोरडगावकडून एकामागे एक असे दोन डंपर पाथर्डीकडे येतांना दिसले.
पथकाची खात्री होताच डंपर चालकास थांबण्याचा इशारा केला. डंपर रस्त्याच्याकडेला उभा केला असता त्यामध्ये वाळू मिळून आली. वाळू वाहतुकीचे परवान्या बाबत विचारपुस केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. तिघांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला आहे. डंपरचे मालक पसार झाले आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
दरम्यान पोलिसांनी अटक केलेला विजय अशोक चेमटे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर नगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगावसह बीड जिल्ह्यातील चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.