अवैध वाळू वाहतूक करणारे दोघे जेरबंद

एलसीबीची कारवाई || 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
अवैध वाळू वाहतूक करणारे दोघे जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेवगाव तालुक्यातील आखातवाडे गावच्या शिवारात ढोरा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहेत. त्यांच्याकडून 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

संदीप रमेश वाघमारे (वय 25, रा. देवटाकळी ता. शेवगाव), पप्पू कचरू तुजारे (वय 30 रा. हिंगणगाव ता. शेवगाव, जि. नगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. मधुकर उर्फ भाऊ पोपट वाघमारे (रा. देवटाकळी ता शेवगाव), हा पसार झाला आहे. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात शिवाजी ढाकणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार शेवगाव तालुक्यातील ढोरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलीस निरीक्षक आहेर यांनी तत्काळ पथकास कारवाई करण्याच्या सूचना केला. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दत्तात्रेय गव्हाणे, सागर ससाणे, शिवाजी ढाकणे, जालिंदर माने हे मिळालेल्या माहिती गुरुवार (दि.4) रोजी पहाटे 3 वाजता घटनास्थळी दाखल झाले. नदीपात्रात एक विना नंबरचा पिवळ्या रंगाच्या टेम्पोमधून अवैध वाळू वाहतूक करणारे वाघमारे व पप्पू तुजारे यांना ताब्यात घेतले. मात्र, पोलीस पथकाची चाहूल लागताच काही कामगार अंधाराचा फायदा घेऊन काटवनात पळून गेले.

टेम्पो मालकीबाबत विचारले असता मधुकर उर्फ भाऊ पोपट वाघमारे याचा असल्याचे सांगितले. पुढील कारवाई शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी करत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव उपविभागीय प्रभारी पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com