
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
अवैध वाळू चोरी व वाहतुकीविरुध्द कारवाई करुन पोलिसांनी एक झेनॉन गाडी व एक ब्रास वाळु असा एकुण 5 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, पोलीस नाईक संतोष लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत जाधव, जालिंदर माने, रोहित येमुल व चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसळकर यांचे पथक नेमून अवैध वाळू चोरी व वाहतुकी विरोधात कारवाई करण्याचा आदेश दिला होता.
त्यानुसार या पथकाने श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करुन अवैधरित्या वाळू चोरी व वाहतूक करणार्या ठिकाणी छापा टाकुन एकूण 5 लाख 10 हजार रुपये किंमतीची एक झेनॉन माल वाहतूक गाडी व एक ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त करुन महेश विष्णू बोरुडे (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर), सागर धुमाळ (रा. गोंधवणी रोड, ता. श्रीरामपूर) व अनुप लोढा (रा. रासकरनगर, श्रीरामपूर) यांच्याविरुध्द श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 226/2023, भादंवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदरची कारवाई केली.