अवैध वाळू उपशाची पाहणी करणार्‍या महिला तलाठ्यास शिवीगाळ

चिंचोली फाटा येथील घटना; एका जणाविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल
अवैध वाळू उपशाची पाहणी करणार्‍या महिला तलाठ्यास शिवीगाळ

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील चिंचोलीफाटा येथील प्रवरा नदीपात्रातील अवैध वाळू उपसावर दोन दिवसांपूर्वी केलेल्या कारवाई नंतर त्याठिकाणी पुन्हा वाळू उपसा सुरू झाला का? याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका कामगार तलाठी महिलेस अश्लिल शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका जणावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी तालुक्यातील महिला कामगार तलाठी व दोन कर्मचारी चिंचोलीफाटा येथील प्रवरा नदीपात्रात पाहणी करीत असताना तेथे वाळू तस्करी करणारा महेश राजेंद्र सोनवणे आला व त्याने महिला तलाठीस तू माझे वाळूचे तरफा कोणाला विचारून सोडून दिले. असे म्हणून अश्लिल भाषेत शिवीगाळ करून लज्जा उत्तन्न होईल, असे वर्तन करून तू कशी काम करते? तेच पाहतो, अशी धमकी देऊन महिला तलाठी हिचा विनयभंग करून सरकारी कामात अडथळा आणला.

महिला कामगार तलाठी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महेश राजेंद्र सोनवणे याच्या विरोधात सरकारी महिला कर्मचार्‍याचा विनयभंग व सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, चिंचोली फाटा येथे अवैध वाळू उपसा खुलेआम सुरू असून महसूल अधिकार्‍यांच्या मेहेरबानीमुळे वाळू तस्कर मुजोर झाले असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

Related Stories

No stories found.