श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील कौठा गावाच्या शिवारात वनविभागाच्या क्षेत्रा लगत भिमा नदीच्या पात्रात अवैधरित्या सुरू असलेल्या

वाळूचा उपसा करणार्या बोटीवर श्रीगोंदा पोलीसांनी कारवाई केली. या कारवाईत तीन बोटी आणि इतर साहित्य असा 27 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

कौठा गाव शिवारात यांत्रिक फायबर बोटीच्या सहाय्याने विनापरवाना अवैध वाळूचा उपसा करीत असल्याची माहिती श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. ढिकले यांनी सहायक पोलीस निरिक्षक दिलीप तेजनकर, हवालदार प्रताप देवकाते, प्रकाश मांडगे, गोकुळ इंगवले, कुलदीप घोळवे, दादासाहेब टाके, किरण बोराडे, रवि जाधव, अमोल आजबे यांना सूचना देत, मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन खात्री करून छापा टाकला.

कौठा गावचे शिवारात भिमा नदीपात्रात बाबुराव राजू पाटोळे (रा. नानवीज, ता. दौंड जि. पुणे) याच्या मालकीच्या दोन फायबर व दोन सेक्शन बोटी व सोनू व्यंकटेश बल्याळ (रा. शालीमार चौक दौंड ता. दौंड जि. पुणे) हे बोटींना डिझेल इंजिन यंत्राच्या सहाय्याने नदी पात्रात अवैधरित्या गौण खनिज वाळूचा उपसा करताना सापडले.

यावेळी या ठिकाणी असणार्या व्यक्ती पोलिसांना पाहताच नदीतील पाण्यात उड्या मारून पळून गेले. पोलिसांनी तीन फायबर बोटी व तीन सेक्शन असा 27 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक तेजनकर करत आहेत.