अवैधरित्या सुरू असलेला बेसुमार वाळू उपसा बंद करा

ग्रामस्थ एकटवले; जांबूत बुद्रुकच्या ग्रामसभेत ठराव
अवैधरित्या सुरू असलेला बेसुमार वाळू उपसा बंद करा
संग्रहित

घारगाव |वार्ताहर| Ghargav

मुळा नदीतून बेकायदा वाळू उपसा तर होतच आहे. परंतु जांबूत गावातून खैरदरा परिसरात जाणारा नवीन रस्ता अवघा तीन महिन्यांत उखडल्याने ही वाळू वाहतूक रस्त्यांच्या मुळावर उठलेली आहे. अवैधरित्या सुरू असलेला बेसुमार वाळू उपसा बंद होण्याकरिता जांबूत बुद्रुक च्या ग्रामसभेत एकमताने ठराव घेण्यात आला असून सर्वच ग्रामस्थ एकवटले आहेत.

रात्री-अपरात्री जांबूत बुद्रुक येथून अवैधरित्या वाळू वाहतूक होत असते. याबाबत तक्रार करूनही स्थानिक महसूलकडून कुठलीही कारवाई होत नाही. सर्रासपणे वाळू वाहतूक सुरूच असते. बर्‍याच दिवसांनी गावात रस्ता झाला. परंतु वाळू वाहून नेणार्‍या वाहनांमुळे रस्ता उखडला आहे. गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. वाळू वाहून नेणार्‍या वाहनांतील पाणी रस्त्यांवर पडल्याने मोठ्या प्रमाणात चिखल होतो. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढावी लागते. त्यामुळे मुले शाळेत जाण्यास टाळाटाळ करतात. वाळूने भरलेली वाहने भरधाव असतात. इतर वाहनांचा, पायी जाणार्‍या ग्रामस्थांना या वाळू वाहनांपासून धोका आहे.

अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाळू वाहणार्‍या लोकांना विरोध करत वाळू वाहतूक बंद करण्यासाठी सांगितले आहे. परंतु समजुतीने सांगूनही ते ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे वाळू वाहणारे आणि ग्रामस्थ यांच्यात वादावादी होत आहे. ग्रामस्थांना दमदाटी करण्यात येत असून या संदर्भाने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना स्थानिक ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. मागील दोन वर्षांच्या काळात संगमनेर तालुक्यात महसूल विभागाकडून मोठ्या प्रमाणात वाळू तसकारांना पाठबळ मिळाल्याने वाळूतस्करी वाढल्याची चर्चा गावागावांत झडत आहे.

आमच्या गावाने प्रशासनाला वारंवार विनवण्या करुनही येथील वाळू उपसा थांबलेला नाही. त्यामुळे संपूर्ण गावाने एकी दाखवित ग्रामसभा बोलावून सर्वानुमते ठराव केला असून यापुढे आमच्या गावच्या परिसरातून वाळूतस्करी होऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जांबूत गावचे ग्रामस्थ नदीकाठी पहारा देत असून कोणताही ट्रॅक्टर अथवा डंपर नदीपात्रात दिसला तर तो आम्ही पकडून त्यावर कारवाई करण्यास भाग पाडणार आहोत.

- उत्तम बुरके, सरपंच, जांबूत बुद्रुक.

वाळू उपसा ही आता गावागावांची समस्या बनली आहे. यातून भविष्यात होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी राजकारण सोडून सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी जांबूत गावाने पुढाकार घेतला असून ग्रामसभेत ठराव करून या परिसरातील वाळू उपसा थांबविण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. जांबूतसह तालुक्यातील नद्यांमधून होणारा अनधिकृत वाळू उपसा थांबविण्याची गरज आहे.

- मीरा शेटे, सभापती जि. प. महिला व बालकल्याण समिती

Related Stories

No stories found.