बेकायदा रेमडेसिवीर विक्री ; सखोल चौकशीसाठी काँग्रेसचेे धरणे आंदोलन

बेकायदा रेमडेसिवीर विक्री ; सखोल चौकशीसाठी काँग्रेसचेे धरणे आंदोलन

नेवासा (तालुका प्रतिनिधी) - बेकायदेशीर रेमडेसिवीर विक्री प्रकरणी गुन्हा नोंदवून 16 दिवस उलटूनही पोलीस तपास धिम्या गतीने सुरु असल्याच्या निषेधार्थ येत्या दि.27 मे रोजी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन करण्याचा इशारा नेवासा काँग्रेसने लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नगरच्या गुन्हे अन्वेषण शाखेने दि.9 मे रोजी सापळा रचून वडाळा बहिरोबा येथे टाकलेल्या छाप्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणार्‍या टोळीला जेरबंद केले होते.

गंभीर प्रकरण उघडकीस येऊनही या गुन्ह्याचा योग्य पद्धतीने तपास होत नसल्याचा आरोप नेवासा काँग्रेसने या निवेदनात केला आहे. हे प्रकरण धसास लागून यात सामील खाजगी कोविड रुग्णालय चालक,मेडीकल स्टोअर चालक तसेच काही शासकीय अधिकार्‍यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्या मुसक्या आवळण्याच्या आग्रही मागणीसाठी येत्या दि.27 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे, उपाध्यक्ष सुनील भोगे, सरचिटणीस प्रवीण तिरोडकर, संघटक संदीप मोटे, नेवासा शहराध्यक्ष रंजन जाधव, जिल्हा सरचिटणीस सुदाम कदम, मीडिया प्रमुख सचिन बोर्डे, कमलेश गायकवाड, साहेबराव पवार, युवकचे कार्याध्यक्ष आकाश धनवटे, एस.सी. विभाग तालुकाध्यक्ष नंदकुमार कांबळे,सौरभ कसावणे आदींची नावे आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com