
अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथील स्वस्त धान्य दुकानातील तीन लाख 56 हजार 454 रूपये किंमतीच्या धान्यात अफरातफर करून ते दुसरीकडे विक्री केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकान चालक भाऊसाहेब भिमराज शिंदे (वय 38 रा. पिंपळगाव माळवी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक महादेव अर्जुन कुंभार (वय 35 रा. भिस्तबाग, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पिंपळगाव माळवी विविध कार्यकारी सोसायटीच्या अंतर्गत स्वस्त धान्य दुकान सुरू आहे. 26 मार्च रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी स्वस्त धान्य दुकानाची तपासणी केली असता सदर स्वस्त धान्य दुकानात कमी अधिक प्रमाणात तफावत दिसून आली होती. त्यावेळी पुरवठा अधिकारी यांनी सोसायटीचे चेअरमन यांना नोटीस देऊन खुलासा मागितला होता. यानंतर 20 जुलै रोजी पुरवठा निरीक्षक यांनी स्वस्त धान्य दुकानातील साठा तपासणी केली.
तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, दुकानातील तीन लाख 56 हजार 454 रूपये किंमतीचे गहू, तांदूळ, साखर, दाळ, मका असे स्वस्त धान्याची गरजू लाभार्थ्यांना वाटप न करता त्याची साठवणूक करून ते परस्पर दुसरीकडे विक्री केले. यानंतर पुरवठा निरीक्षक यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी शिंदे विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे करीत आहे.