
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
बेकायदेशीर सावकारी व्यवहार केल्याप्रकरणी नेवासा तालुक्यातील जेऊर येथील पति-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी नेवासाचे सहाय्यक निबंधक गोकुळ नांगरे यांना दिले आहेत. श्री. नांगरे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक आर.के. शिंदे यांची नियुक्ती केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मजलेशहर (ता. शेवगाव) येथील बापूसाहेब मोहन लोंढे यांनी त्यांचे मालकीची वडुले (ता. नेवासा) येथील गट नं. 38 प्रमाणे 5 एकर 38 गुंठे ही शेतजमीन गहाण देऊन त्यांचे कुटुंबात आजारपणामुळे होणार्या दवाखाना खर्चासाठी जेऊर हैबती (ता. नेवासा) येथील नात्यातील एका व्यक्ती व त्याच्या पत्नीकडून व्याजाने 4 लाख रुपये घेतले होते. या पैशासाठी गहाण म्हणून त्यांची वर नमूद केलेली जमीन दिली आहे.
सदर जमीन ही व्याजाने घेतलेल्या पैशाच्या बदल्यात कायम खरेदी खताने लिहून दिली आहे. त्यांना व्याजासह पैसे देण्यास तयार असूनही ते शेतजमीन परत देत नाहीत. जमीन परत मिळण्यासाठी योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी करून तक्रारदाराने त्यांचे म्हणणे शपथपत्रावर सादर केले आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणून दोघांत झालेला करारनामा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, नेवासा यांचे कार्यालयास सादर केलेला आहे.
त्या अनुषंगाने सहाय्यक निबंधक यांचेसमोर झालेल्या सुनावणीत सदरचा व्यवहार हा बेकायदेशीर सावकारी व्यवहार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळे अधिनियम कलम 18 अन्वये उपरोक्त मालमत्तेबाबत निर्णय देण्याचे अधिकार जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर यांचे कार्यालयास असल्याने अहवाल सादर केला होता.
सदर अहवाल पाहता बेकायदेशीर छुपा सावकारी व्यवहार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे नमूद केले असल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल या कार्यालयास सादर करावा, असे आदेश जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गणेश पुरी यांनी नेवासा सहाय्यक निबंधक गोकुळ नांगरे यांना दिले होते.या आदेशावरून श्री. नांगरे संबंधित पति-पत्नीवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून आधीन सहाय्यक निबंधक आर. के. शिंदे यांची नियुक्ती केली आहे.