बेकायदेशिर देशी दारुचे दुकान वादाच्या भोवर्‍यात

कासारा दुमाला येथील घटना; भूमिअभिलेखचा खोटा दाखला बनवला
बेकायदेशिर देशी दारुचे दुकान वादाच्या भोवर्‍यात

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

तालुक्यातील कासारा दुमाला येथील देशी दारूचे दुकान वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. शासनाची कोणतीही परवानगी न घेता या दुकानाची जागा बदलण्यात आली आहे. यासाठी चक्क भुमी अभिलेख खात्याचा खोटा दाखला बनवून त्याचा गैरवापर संबंधिताने केला असल्याचे धक्कादायक वृत्त हाती आले आहे. ग्रामपंचायतीचाही कुठलाही दाखला नसताना हे देशी दारूचे दुकान खुलेआम सुरू असल्याने परिसरातील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

संगमनेर शहरालगतच्या कासारा दुमाला ग्रामपंचायत हद्दीमध्ये हे दुकान गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या दुकानाचे मूळ मालकाच्या वारसाच्या घरगुती वादामुळे हे दुकान बंद होते. नंतरच्या काळामध्ये हे प्रकरण जिल्हाधिकार्‍यांकडे गेले. जिल्हाधिकार्‍यांनी सप्टेंबर 2019 मध्ये त्यांच्या कुटुंबातील वाद निकाली काढला. यानंतर येथे सरकार मान्य देशी दुकान सुरू करण्यात आले आहे. त्याच जागेवर देशी दारू दुकान सुरू करण्याऐवजी हे दुकान विनापरवाना आणि बेकायदेशीर दुसर्‍या जागेवर सुरू करण्यात आले.

सध्या ज्या ठिकाणी हे दारूचे दुकान सुरू आहे त्या ठिकाणी मंदिर व एका बाजूला स्मशानभूमी अस्तित्वात आहे. सदर जागा ही रहिवासी व अतिक्रमण पुर रेषेच्या आतील क्षेत्र आहे. या दुकानाच्या लगतच एका बाजूला आणखी एक मंदिर आहे. दारूच्या दुकानांमध्ये अनेक मद्यपी येऊन दारू पितात. यामुळे या परिसरातून येणार्‍या-जाणार्‍या भाविकांना या दारूच्या दुकानाचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सदर दुकानावर त्वरीत कारवाई करून हे दुकान बंद करावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे.

दुकान मालकाने शासनाची फसवणूक करून बेकायदेशीररित्या देशी दारूचे दुकान सुरू केले आहे. नियमानुसार जागा बिनशेती असणे गरजेचे आहे मात्र ही जागा बिनशेती नाही तसेच म्हाळुंगी नदीच्या पूररेषेच्या आत व अतिक्रमण जागेत हे दुकान आहे. हे दुकान सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचा कुठल्या प्रकारचा ना हरकत दाखला घेण्यात आलेला नाही. हे दुकान स्मशानभूमी लगत असल्याने स्थानिक रहिवाशांना त्याचा त्रास होत आहे. जागा मालक यांनी बेकादेशीर बांधलेल्या घरात अवैधरित्या हा व्यवसाय सुरू आहे.

दरम्यान या देशी दारू दुकान विषयी सरपंचाकडे चौकशी केली असता ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारचा दाखला दुकान मालकाला दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. या दारूच्या दुकानात महिलाही काम करतात. अनेक मद्यपी या दुकानात येत असल्याने संबंधित महिलेला धोका होऊ शकतो याशिवाय दुकानात अनेकदा शालेय मुले दारूच्या बाटली घेण्यासाठी येत असतात असे ग्रामस्थांनी सांगितले.

परवानगी नसतानाही हे दुकान सुरू असल्याने ग्रामपंचायतीने हे दुकान बंद का केले नाही असा सवाल ग्रामस्थ मधुन विचारला जात आहे. या दुकानाला परवानगी देणार्‍या सर्व संबंधित अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आता ग्रामस्थांमधून केली जात आहे. सातबारा उतारा निघत नसतानाही व जागा येणे नसतानाही दुकानाचे लायसन शिफ्ट केले कसे, असे करणे कायदेशीर आहे का?, शिफ्टिंग परवानगी कोणी दिली, जागेचा सातबारा उतारा निघत नसतानाही ग्रामपंचायतीचा असेसमेंट उतारा भूमी अभिलेख कार्यालयाला देण्यात आला. या बाबींची चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

दारूच्या दुकानासाठी कोणताही दाखला दिला नाही. कासारा दुमाला ग्रामपंचायतीमध्ये एका महिलेच्या नावाने घराची नोंद आहे. ग्रामपंचायतीने त्यांना नळकनेक्शन दिले आहेत. ग्रामपंचायतीने त्यांना फक्त लोकसंख्येचा उतारा दिलेला आहे. इतर कोणत्याही प्रकारचा दाखला ग्रामपंचायतीकडून संबंधितांना देण्यात आलेला नाही. दारूच्या दुकानासाठी कोणताही ना हरकत दाखला दिलेला नाही. आपण अनेक वर्ष बाहेरगावी होतो. त्यानंतर आल्यावर आपण सरपंच झालो, या प्रकरणाची सखोल माहिती घेतली जाईल.

- राजेंद्र त्रिभुवन, सरपंच, कासारा दुमाला ग्रामपंचायत

दरम्यान याबाबत कासारा दुमाला ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री. गुंजाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना याबाबत फारशी माहिती नसल्याचे दिसले. ग्रामपंचायतीने दारूच्या दुकानासाठी ना हरकत दाखला दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी दारूचे दुकान सुरू केले ती जागा गावठाण हद्दीत आहे. या जागेचा सातबारा उतारा निघत नाही असे त्यांनी सांगितले. परवानगी नसतानाही संबंधिताने दारूचे दुकान दुसर्‍यांंदा कसे हलवले ग्रामपंचायतीने याबाबत कारवाई केली का असे विचारले असता माहिती घेऊन सांगतो असे गुंजाळ यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com