अवैध सावकारकीतून झाला प्लॉटचा व्यवहार

सहकार खात्याच्या चौकशीतून निष्पन्न: कोतवालीत गुन्हा दाखल
अवैध सावकारकीतून झाला प्लॉटचा व्यवहार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नालेगाव येथील स.नं. 48- अ 1/48/48 ब प्लॉट नंबर 11 चा व्यवहार अवैध सावकारकीतून झाल्याचे उपनिबंधक सहकारी संस्था, नगर तालुका यांच्या चौकशीतून समोर आले आहे. याप्रकरणी येथील कोतवाली पोलीस ठाण्यात शिवशंकर शांतिलाल भंडारी (रा. दाळमंडई) याच्याविरूध्द महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम 39 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील शेख अल्ताफ अब्दुल कादर (वय 40 रा. आलमगीर, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे.

उपनिबंधक सहकारी संस्था, नगर तालुका यांच्याकडे अभय रामलाल ललवाणी यांनी 9 फेब्रुवारी, 2021 च्या सावकारी व्यवहारात दिलेले गहाणखत 8 डिसेंबर, 2005 हे रद्द होणेबाबत तक्रार अर्ज दिला होता. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी उपनिबंधक सहकारी संस्था, नगर तालुका यांना कार्यवाही करण्याचे कळविले होते. त्यानुसार अर्जदार ललवाणी यांना त्यांचा कार्यालयात 15 मार्च, 2021 रोजी बोलवून सादर केलेले म्हणणे व कागदपत्राची पडताळणी करून उपनिबंधक सहकारी संस्था, नगर तालुका यांनी 28 जुलै, 2021 रोजी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 कलम 16 अन्वये निर्देश जारी करून दोन पथकाची नेमणुक केली होती.

नेमणूक केलेल्या पथकाने 29 जुलै, 2021 रोजी शिवशंकर भंडारी यांच्या राहत्या घरी व कार्यालयात झडतीमध्ये प्राप्त झालेले कागदपत्र व पंचनामा उपनिबंधक सहकारी संस्था नगर तालुका या कार्यालयात 29 जुलै, 2021 रोजी सादर केला होता. 30 ऑगस्ट, 2021 रोजी व त्यानंतर वेळावेळी सुनावणी घेण्यात आली. वेळावेळी झालेल्या सुनावणीवेळी ललवाणी व भंडारी यांनी कागदपत्रे, तोंडी व लेखी म्हणणे दाखल केलेले होते. त्यानंतर उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडील पथकाने 19 एप्रिल, 2022 रोजी सदर मिळकतीची प्रत्यक्ष पाहणी केली.

सदर सुनावणीवेळी दाखल झालेले कागदपत्रे, तोंडी व लेखी म्हणणे तसेच उपरोक्त घर व कार्यालय झडती घेवुन प्राप्त झालेले कागदपत्रे व स्थळ पाहणी अहवाल यावरून मिळकत अवैध सावकारकीतून केल्याचे दिसून येत असल्याने समोर आले आहे. यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com