सावकार अडकला कर्जत पोलिसांच्या जाळ्यात

व्याजापोटी कोरे धनादेश आणि कारचीही नोटरी करून घेतली
सावकार अडकला कर्जत पोलिसांच्या जाळ्यात

कर्जत (प्रतिनिधी) / Karjat - कर्जत पोलिसांच्या आवाहनानंतर तालुक्यात अवैध सावकारकीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. आता सावकारकीच्या चौथ्या घटनेने सावकारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. कर्जत येथील तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी एजाज उर्फ गोप्या सय्यद (रा.कर्जत) याच्याविरुद्ध सावकारकी व इतर कलमान्वये कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक संकट ओढावल्याने फिर्यादीने गाडीचे हप्ते भरण्यासाठी एजाज उर्फ भोप्या सय्यद याच्याकडून ऑक्टोबर महिन्यात व्याजाने 2 लाख रुपये घेतले होते. त्या व्याजाचा दर हा एक लाखाला प्रतिदिन 1 हजार रुपये असा होता. त्यानंतरही ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसल्याने फिर्यादीने सय्यद याच्याकडून टप्प्याटप्प्याने दीड लाख रुपये घेतले. या सर्व रकमेला लाखाला एक हजार रुपये याप्रमाणे व्याज द्यावे लागत होते. आरोपीने व्याजाला चक्रीवाढ रक्कम लावल्याने मुद्दलाची रक्कम 6 लाख रुपयांवर गेली.

फिर्यादीने व्याजापोटी 3 लाख दिले. 3 लाखांची रक्कम देऊनही 9 लाख रुपये आणखी द्यावे लागतील असे आरोपीने सांगितले. वसुलीसाठी तो दमदाटी व शिवीगाळ करत होता. त्याने फिर्यादीच्या स्विफ्ट कारची नोटरी करून त्याच्याकडून 2 कोरे धनादेशही घेतले. विनंती करूनही सय्यदने काहीही ऐकले नाही. अखेर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कर्जतचे निरीक्षक चंद्रशेखर यादव, अंमलदार भाऊसाहेब यमगर, सचिन वारे यांनी केली. पुढील तपास पोलीस अंमलदार महादेव गाडे करत आहेत.

अवैध सावकारकी करुन वसुलीसाठी वारंवार फोन करणे, घरी येणे, शिवीगाळ करणे, वस्तू उचलून नेणे असा त्रास देणार्‍यांनी पोलीस स्टेशनला संपर्क करा.

- चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com