अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर पुरवठा विभागाच्या धाडी

सावेडी, नालेगावात कारवाई || पावणे चार लाखांचा मुद्देमाल जप्त
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडी उपनगरात तसेच नालेगाव भागातील शासकीय मोकळ्या जागेत अवैधरित्या सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग सेंटरवर जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. 31) दुपारी छापा टाकून कारवाई केली. दोन्ही ठिकाणाहून तीन लाख 70 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधीत व्यक्ती विरूध्द तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अन्नधान्य वितरण विभागाच्या पुरवठा निरीक्षक निशा मोरेश्वर पाईकराव (रा. चांदणी चौक, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

सावेडी उपनगरातील सोनानगर चौक, बारस्कर मळा या ठिकाणी एक इसम पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅस टाक्यातील गॅस अवैधरित्या एलपीजी वाहनामध्ये रिफिलिंग करत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांना मिळाली होती. त्यांनी पथकासह सदर ठिकाणी पंचासमक्ष साडे अकराच्या सुमारास छापा टाकला असता एका रिक्षा मध्ये गॅस भरण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. गॅस भरणारा इसम त्या ठिकाणाहून पळून गेला. सनी दत्ता शिंदे (रा. वैदुवाडी, सावेडी) असे त्याचे नाव आहे. त्याच्या विरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर ठिकाणाहून पथकाने गॅस रिफिलिंग मशीन, गॅसच्या भरलेल्या व रिकाम्या टाक्या, दोन रिक्षा, वजनकाटा असा दोन लाख 52 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याच पथकाने दुसरी कारवाई दुपारी दोनच्या सुमारास नालेगाव अमरधाम शेजारी असलेल्या शासकीय जागेत केली. तेथे विशाल विजय कांबळे हा त्याच्या मित्रांच्या मदतीने गेली पाच ते सहा वर्षांपासून अवैधरित्या गॅस रिफिलिंग सेंटर चालवित होता. जिल्हा पुरवठा अधिकारी बडे यांच्या पथकाने सदर ठिकाणी पंचासमक्ष छापा टाकला असता गॅस रिफिलिंगचा प्रकार समोर आला. त्या ठिकाणाहून गॅस रिफिलिंग मशीन, वजन काटा, गॅसच्या भरलेल्या व रिकाम्या टाक्या असा एक लाख 18 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुरवठा निरीक्षक पाईकराव यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात विशाल कांबळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी बडे, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना पागिरे, पुरवठा निरीक्षक पाईकराव, वरिष्ठ लिपीक किशोर जाधव, चालक योगेश शहाणे यांच्या पथकाने केली आहे.

नागरिकांच्या जिवाशी खेळ

सनी शिंदे याच्या अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर पुरवठा विभाग, तोफखाना पोलिसांनी यापूर्वी दोन वेळा कारवाई केली आहे. कारवाई केल्यानंतर देखील शिंदे हा पुन्हा गॅस रिफिलिंग सेंटर सुरू करून नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. आता पुन्हा पुरवठा विभागाने कारवाई करून सनी शिंदे याचे रिफिलिंग सेंटर बंद पाडले आहे. त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com