अवैध व्यवसाय हद्दपार करणार - अधीक्षक ओला

श्रीगोंदा पोलीस ठाण्याचा घेतला आढावा
अवैध व्यवसाय हद्दपार करणार - अधीक्षक ओला

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

पोलिसांचे मूळ काम कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारांवर अंकुश ठेवणे व लोकांपर्यंत पोहोचणे हे आहे. गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलिसांकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील. सातत्याने कारवाई करत अवैध व्यवसाय हद्दपार करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिला.

जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी रविवार (दि.13) श्रीगोंदा पोलिस ठाण्याला भेट देत श्रीगोंदा पोलीस ठाण्यासह कर्जत, जामखेड, मिरजगाव, बेलवंडी पोलीस ठाण्याच्या कारभाराचा आढावा घेतला.

दैनिक सार्वमतमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील अवैध व्यवसायाबाबतीत वृत्त प्रकाशीत झाले होते. तालुक्यातील बहुतांशी गावांत मटका, अवैध दारू, जुगार, गांजा, गुटखा धंदे तेजीत असताना श्रीगोंदा पोलीस ठोस कारवाई करताना दिसत नाहीत. अशात श्रीगोंद्यात भेटीला आलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या अवैध व्यावसायिकांवर जरब बसवण्यासाठी कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. अधीक्षक ओला यांनी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्याकडून पोलीस ठाण्यासह कार्यक्षेत्रातील गावांची सविस्तर माहिती घेतली.

यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस ठाणे तसेच संपूर्ण आवाराची तसेच आवारात असलेल्या सबजेल मधील कैद्यांची पाहणी केली. तसेच पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे व उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाची माहिती घेत गुन्हे कसे डिटेक्ट करायचे यासंदर्भात अधिकार्‍यांसह पोलीस कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करत त्यांना सूचना दिल्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, बेलवंडी पोलीस ठाण्याचे पो. नि. मच्छिंद्र खाडे, कर्जतचे पो. नि. चंद्रशेखर यादव, मिरजगावचे पो.नि.दिवटे उपस्थित होते.

असभ्य वर्तन करणारांवर लक्ष

पोलिसांनी लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या मनातील वर्दीची असलेली भीती दूर करून प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना अधीक्षक ओला यांनी दिल्या. तसेच लोकांसोबत असभ्य वर्तन करणार्‍या पोलिसांवरही विशेष लक्ष ठेवणार असल्याचे सूचित केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com