
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस ठाण्यांना दिले आहेत. अवैध दारू, मटका, जुगार, बिंगोविरोधात कारवाई करून धंदे बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून आठ दिवसांमध्ये ही कारवाईची मोहीम राबविण्यात येणार आहे. यामुळे अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
अलिकडच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारूची निर्मिती करून विक्री करण्याचे उद्योग शहरासह गावा-गावात फोफावले आहेत. ही दारू तयार करताना विषारी द्रव्यांचा देखील वापर केला जात आहे. दारू बरोबरच मटका, जुगार, बिंगो या अवैध धंद्याने कहर केला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मटका, जुगार, बिंगो खेळला जात आहे. याकडे तरुण पिढी अधिक आकर्षित झाली आहे. अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरात वर्दळीच्या जागेवरच क्लब चालकांनी बस्तान बसविले आहेत. या अवैध धंद्यांचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असून अशा अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासंदर्भात मागणी होत आहे.
अधीक्षक पाटील यांनी याची गंभीर दखल घेतली असून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना पथके स्थापन करून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच स्थानिक पोलिसांनाही येत्या आठ दिवसांमध्ये विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे सांगितले असल्याने अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
‘कलेक्टर’ निशाण्यावर
अधीक्षक पाटील यांनी अवैध धंद्याविरोधात कारवाईचे आदेश दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांकडून स्थानिक पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई केली जाणार आहे. यामुळे स्थानिक पोलीस ठाण्यातील कलेक्टर निशाणावर आला आहे. तो दरमहिन्याला या धंद्यावाल्यांकडून मलिदा गोळा करत असतो. यामुळे पैसे देऊन देखील कारवाई झाली तर कलेक्टर अवैध धंद्यावाल्यांच्या निशाणावर असणार आहे.