अवैध धंद्यामुळे नगर शहरातील गुन्हेगारी वाढली

खून, दरोडा, घरफोड्यांचे सत्र सुरूच
अवैध धंद्यामुळे नगर शहरातील गुन्हेगारी वाढली

अहमदनगर|Ahmedagar

शहरासह उपनगरामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली असून शहराची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. दोन दिवसांमध्ये दोन खूनांच्या घटना घडल्या आहे. दोन्ही खूनाच्या घटना दारूच्या कारणातून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यामुळे अनलॉकनंतर शहरातील गुन्हेगारीत वाढ होण्यास अवैध दारू, मटका, बिंगो, जुगार कारणीभूत आहे. शहर पोलिसांकडून अवैध धंद्यावर कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

करोनाच्या दुसर्‍या लाटेत शहरातील कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प तसेच नगर तालुका व एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारीत घट झाली होती. करोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने निर्बंध शिथील करण्यात आले आहे. यामुळे बाजारपेठ सुरू झाली आहे. निर्बंध शिथील होताच अवैध धंद्यांत वाढ झाली आहे. यामध्ये दारू, मटका, जुगार, गुटखा, बिंगोचे धंदे जोरात सुरू झाले आहे. लोकांनी घराबाहेर पडण्यास सुरूवात केली आहे. यामुळे दारू, मटका, जुगारातून वाद वाढले आहे. या वादातून खून, खूनाचा प्रयत्न, हाणामारीच्या घटना वाढल्या आहेत. पोलीस दप्तरी दररोज गुन्हे दाखल होत आहे.

पोलिसांकडून अवैध धंद्यांवर मात्र कारवाई होताना दिसत नाही. खुलेआम दारू विक्री, मटका-जुगार सुरू आहे. दोन दिवसापूर्वी रामवाडीतील एकाला दोघांनी उचलून नेत दारू पाजून मारहाण केली. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर गुरूवारी सायंकाळी नेप्ती नाका परिसरात एका इसमाचा डोक्यात दगड घालून अमानुष हत्या करण्यात आली. सदर इसमाने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही, म्हणून एकाने त्याच्या डोक्यात दगड घालून या व्यक्तीचा खून केला. नेप्ती नाका येथे खुलेआम दारू विक्री सुरू आहे. त्याच ठिकाणी ही घटना घडली. कोतवाली पोलिसांकडून या दारू विक्रेत्यांवर कारवाई केली जात नाही.

शहरातील दुचाकी, चारचाकी चोर्‍यासह घरफोड्या, दरोड्याच्या घटना वाढल्या आहेत. शहर पोलिसांकडून गुन्ह्यांची उकल होत नसल्याने गुन्हेगारांच्या टोळ्या वारंवार असे कृत्य करत आहे. नागरिकांची सुरक्षा पोलिसांवर असून पोलिसांकडून गस्तीमध्ये वाढ केल्यास, गुन्ह्यांची उकल केल्यास, सराईत गुन्हेगारांच्या वेळीस मुसक्या आवळल्यास गुन्हेगारी रोखण्यात मदत होणार आहे. परंतु, तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यासह तालुका, एमआयडीसी पोलिसांकडून याकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. याकडे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

‘डीबी’ करते काय ?

पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात गुन्हे प्रगटीकरण शाखा (डिबी) असते. चोर्‍या, घरफोड्या, दरोड्याच्या घटना घडल्यास त्याची उकल करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम डिबी पथकाचे आहे. परंतु, तोफखाना पोलीस ठाण्याची डिबी वादग्रस्त ठरत असून कोतवाली व भिंगार डिबीकडून अपेक्षीत कामगिरी होताना दिसत नाही. वर्षांनुवर्ष एकाच पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसलेल्या व डिबीमध्ये समावेश असलेल्या पोलिसांना बदलण्याची गरज आहे. या कर्मचार्‍यांंकडून अवैध धंद्यांना पाठबल मिळत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com