कारवाई नंतरही संगमनेरात अवैध व्यवसाय सुरुच

पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय
कारवाई नंतरही संगमनेरात अवैध व्यवसाय सुरुच

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

संगमनेर शहर व परिसरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर पोलिसांनी अनेकदा कारवाया करूनही शहरातील सर्वच अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे चित्र आहे. पोलिसांनी कारवाई करूनही हे अवैध व्यवसाय सुरू राहतातच कसे? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत आता नागरिक संशय घेऊ लागले आहे.

संगमनेर शहर व परिसरात बेकायदेशीर कत्तलखाने, गुटखा विक्री, वाळूउपसा, गांजा आदी व्यवसाय खुलेआम सुरू आहेत. गेल्या आठवड्यात शहर पोलिसांनी गुटखा विक्री व कत्तलखान्यावर वेगवेगळ्या कारवाया केल्या. अहमदनगर येथील एल.सी .बी च्या पथकानेही शहरातील अवैध व्यवसायांवर कारवाई केली होती. शहरातील कत्तलखान्यावर वर्षेभरात पोलिसांनी अनेक कारवाया केल्या असे असतानाही शहरातील कत्तलखाने जोरदार सुरू आहे. इतर अवैध व्यवसाय ही सुरू आहे.

अवैध व्यवसाय बंद करा असे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी संगमनेरच्या भेटीनंतर दिले होते. यानंतर दोन-तीन दिवस हे व्यवसाय बंद होते. आता मात्र हे व्यवसाय खुलेआम सुरू आहेत. संगमनेरात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. किरकोळ कारवाई करून आपण खूप काम करीत असल्याचे काही अधिकारी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांची मर्जी राखण्यासाठी अशा कारवाई होत असल्याचे दिसत आहे. गुटखा विक्री व कत्तलखाना यातील मुख्य आरोपी विरुद्ध पोलिस कारवाई करताना दिसत नाही.

मालकाऐवजी पंटरवर गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण संगमनेर मध्ये वाढले आहे. संगमनेरात अनेक अवैध व्यवसाय सुरू असताना पोलीस अधिकारी या व्यवसायांवर मोठी कारवाई करताना दिसत नाही. शहरातील अवैध व्यवसायांवर नगर येथील एल.सी.बी चा पथकाने कारवाई केली. या पथकाला शहरातील अवैध व्यवसाय दिसतात मग संगमनेर शहर पोलिसांना अवैध व्यवसाय का दिसत नाही असा सवाल विचारला जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com