गुन्हेगारांची ठिकाणे शोधून त्या परिसरातील बीट पोलिसिंग सक्षम करणार

पोलीस अधीक्षक ओला यांचा निर्धार || अवैध व्यवसाय रोखण्यावर भर
पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola)
पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola)

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महिला व मुलींची छेडछाड, दुचाकी व चारचाकींच्या चोर्‍या, सोनसाखळी चोरी व अन्य गुन्हे वारंवार घडणारी ठिकाणे शोधून त्या परिसरातील बीट पोलिसिंग अधिक सक्षम करण्यावर भर देणार आहे. बीटवरील अशा पोलीस कर्मचार्‍यांचे व त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचे मोबाईल क्रमांकही महिला-मुली व नागरिकांना देऊन संबंधित पोलीस कर्मचार्‍याची मदत घेण्याची जागृतीही करण्याचे नियोजन असल्याचे जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सोमवारी येथे सांगितले.

अधीक्षक ओला यांनी 22 ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारला. यानंतर त्यांनी सोमवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. नगर जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठीच्या नव्या संकल्पनांची माहितीही त्यांनी दिली. ते म्हणाले, नगर जिल्ह्यात सर्व प्रकारची गुन्हेगारी आहे. विशिष्ट असा गुन्हेगारी पॅटर्न नाही. चोरी, दरोडे, मारामारी, खून, फसवणूक, अत्याचार, वाळू तस्करी व अन्य सर्वप्रकारचे गुन्हे येथे आहेत व राज्यात सर्वाधिक क्राईम रजिस्ट्रेशन आहे. या तुलनेत मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे गुन्हेगारीच्या स्वरूपानुसार त्याचा अभ्यास करून त्यावर मात करण्यावर भर दिला जाणार आहे. नगर शहरात दामिनी पथकाद्वारे महिला व मुलींना छेडछाड व अन्य येणार्‍या अडचणी सोडवल्या जातात, या पथकाची गस्तही सुरू असते. मात्र, ग्रामीण भागात अशा घटना रोखण्यासाठी संबंधित परिसरातील बीट वरील पोलिसावर व त्याच्या स्थानिक वरिष्ठावर जबाबदारी दिली जाणार आहे.

जिल्ह्यातील वाळू उपसा, जुगार, अवैध दारू व्यवसाय, गोवंश वाहतूक, गावठी कट्टे व अन्य प्रकारचे अवैध व्यवसाय रोखण्याचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगर व शिर्डी परिसरात वाहतूक कोंडीचे प्रकार घडतात. त्यामुळे त्याचा अभ्यास करून कोणत्या वेळी रस्त्यावर गर्दी होते, ते पाहून ट्रॅफिक मॅनेजमेंट करण्यावर भर देणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेला आवश्यक ते वाढीव मनुष्यबळ देऊन लवकरात लवकर फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास लावण्यावर भर देणार. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सध्या सुरू असलेली टू-प्लस योजना पुढेही चालू ठेवणार, असे अधीक्षक ओला यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सायबरचे मनुष्यबळ वाढविणार

जिल्ह्यात ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वाढत आहे. त्यामुळे येथील सायबर पोलीस ठाणे आधुनिक करण्यासह तेथील मनुष्यबळ वाढवले जाईल. तसेच ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार कसे होतात व मोबाईल वापरताना नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे, यावर जनजागृतीही करण्यावर भर असणार आहे, असे सांगून पोलीस अधीक्षक ओला म्हणाले, ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे सायबर पोलीस ठाण्यात दाखल होतात, पण तेथे येणे अनेकांना लांब पडते. त्यामुळे तक्रारदारांना त्यांच्या जवळच्या पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार देण्याची सुविधा करून नंतर ती तक्रार सायबर पोलीस ठाण्यात तपासासाठी वर्ग करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com