
अकोले |प्रतिनिधी| Akole
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अकोले तालुक्यातील अवैध देशी दारू विक्री करणार्या दुकानांवर छापे टाकत आठ जणांवर कारवाई करत 17 हजार 500 रुपये किमतीच्या देशी दारूचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 श्रीरामपूरचे निरीक्षक यांना मिळलेल्या गुप्त बातमीनुसार अकोले तालुक्यातील राजूर व इंदोरी फाटा येथे छापे मारून अवैध दारू विक्री करणार्या विरुद्ध कारवाई केली आहे. या कारवाईत आनंद अंकुश देशमुख, विक्रम अशोक घाटकर, दीपक बाळू पोलादे, अमोल सुर्यकांत कानकाटे, संजय अदालतनाथ शुक्ला, नवनाथ सुरेश देशमुख, सचिन सुदाम जाधव, भाऊसाहेब बाळाजी शिंदे यांचे वर कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये हॉटेल हिरा, केळुंगण शिवार, राजूर व हॉटेल सह्याद्री इंदोरी फाटा यांचा समावेश आहे. यावेळी हॉटेल सह्याद्रीचा मालक दशरथ आप्पा नवले यांना फरार घोषित करण्यात आले आहे. सदरील कारवाईत मुंबई दारूबंदी कायदा 1949 चे कलमान्वये करण्यात आली आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग विभागीय उपायुक्त अनिल चासकर, राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर चे अधीक्षक गणेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र. 2 श्रीरामपूर निरीक्षक गोपाळ चांदेकर व दुय्यम निरीक्षक एस. जी. शिंदे यांनी केली. या कारवाईत सहाय्यक दुय्यम निरीक्षक के. के. शेख, टी. आर. शेख व माहिला जवान एम. आर. फटांगरे यांनी सहभाग घेतला.