अवैध दारू व्यावसायिकाकडून स्वातंत्र्य दिनाचा अपमान
सार्वमत

अवैध दारू व्यावसायिकाकडून स्वातंत्र्य दिनाचा अपमान

आ. कानडे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Arvind Arkhade

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील व मुख्य रस्त्याच्या कडेला असणार्‍या ओकवूड वाईन शॉपचे मालक यांनी देशाचा स्वातंत्र्यदिन व ड्राय डेचा नियम व कायदा फाट्यावर मारून या अवैध धंदा करणार्‍या व पोलिसांना लाखो रुपयांची देणगी देणार्‍या मद्य व्यावसायिकाने स्वातंत्र्यदिनाचा अपमान केला आहे.

सदरची बाब एका जागरूक श्रीरामपूरकराने फोटो काढून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार लहू कानडे यांच्या निदर्शनास आणली. आ. कानडे यांनी तात्काळ जिल्हा उत्पादन शुल्क अधिकार्‍यांना सदर बाब फोटो पाठवून त्वरित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार उत्पादन शुल्कचे पोलीस निरीक्षक श्री बर्डे व उत्पादन शुल्कचे पीएसआय श्री कोंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली व राजरोस विक्री चालू असणार्‍या मद्य दुकानाचे मालक उत्तम केवळ यांच्यावर मुंबई विदेशी मद्य नियम 1953 चे नियम 55(1) व मुंबई विदेशी मद्य नियम 1953 चे नियम 40(2) नुसार गुन्हा दाखल करून दुकान बंद केले.

या दुकानाचे मालक श्री. केवल यांनी हरेगाव फाटा येथे पोलीस अधिकार्‍यांनी बेकायदेशीर बांधलेल्या पोलीस चौकीसाठी लाख रुपयांची देणगी दिल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. मदने यांनी वृत्तपत्राला मुलाखत देताना सांगितले आहे. वास्तविक सदरची घटना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येते.

स्वातंत्र्य दिन हा देशासाठी पवित्र दिवस असल्याने व सर्वांना शांततेने आनंद साजरा करता यावा म्हणून शासनाने 15 ऑगस्ट ड्राय डे म्हणून घोषित केलेला आहे. ड्राय डे चे पालन होते किंवा नाही तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम पोलीस खात्याचे आहे. परंतु पोलीस खात्याला या वायनरी वाल्यांनी अवैध पोलीस चौक्या कामासाठी पैसे दिलेले असल्याने ड्राय डे च्या दिवशी ही मद्याचे दुकान सुरू ठेवूनही दुर्लक्ष केल्याचे दिसते, असे आ. लहू कानडे यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com