नियमांचे पालन न केल्यास भाजीपाला बाजार बंद करू - जिल्हाधिकार्‍यांचा इशारा

नियमांचे पालन न केल्यास भाजीपाला बाजार बंद करू - जिल्हाधिकार्‍यांचा इशारा

संगमनेर (शहर प्रतिनिधी) - करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने आता सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे. भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. भाजीपाला विक्रेत्यांनी नियमांचे पालन न केल्यास भाजीपाला बाजार तात्काळ बंद करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काल संगमनेर येथे दिला. मोटरसायकलवर फक्त एकाच जणाला फिरण्यास परवानगी असेल विनाकारण डबल सीट फिरताना आढळल्यास कारवाई करा, असे आदेशही त्यांनी दिले.

संगमनेर तालुक्यात करोना बाधितांची संख्या वाढत चालल्याने या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी काल संगमनेरात आले होते. त्यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे आदी उपस्थित होते. शासकीय विश्रामगृहात ते काही वेळ थांबले होते. यावेळी त्यांनी अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना करोना बाबत प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. भाजीपाला बाजार मध्ये नागरिकांची मोठी गर्दी होत आहे, ही गर्दी न थांबल्यास संबंधित बाजार बंद करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. नियम तोडल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही. रुग्णालयांनी ऑडीट टीमने तपासणी शिवाय बिल देऊ नये. रेमडेसिविरला अन्य पर्याय आहे, त्यामुळे कोणत्याही रुग्णालयाने या इंजेक्शनसाठी रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना त्रास देऊ नये, जिल्ह्यात दररोज 40 मृत्यू होत आहेत, यामुळे करोनाला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. नागरिकांनी स्वयंशिस्तीने नियमांचे पालन करावे अन्यथा मृतांची संख्या वाढत जाईल असा इशारा त्यांनी दिला.

याप्रसंगी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी पोलीस कारवाई बाबत माहिती दिली. नियमांचे पालन न करणार्‍या वाहनचालकांकडून दिवसाला पाच लाख रुपयांचा दंड वसूल होत असल्याची माहिती त्यांनी दिली. नागरिकांनी रस्त्यावर विनाकारण फिरू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. जिल्हाधिकार्‍यांनी फौजफाट्यासह शहरातील मुख्य रस्त्यावर फिरून पाहणी केली. नवीन नगर रस्त्यावरील धन्वंतरी रुग्णालयात जाऊन रुग्णांसोबत चर्चा केली औषधे मिळतात का? बिल जास्त आकारले आहे का? असे त्यांनी एकाला विचारले यानंतर त्यांनी डॉक्टरांना बोलावले.काही वेळ त्यांंनी डॉक्टर सोबत चर्चा केली.

जिल्हाधिकार्‍यांनी तालुक्यातील समनापूर येथे काही वेळ थांबून ऊस तोडणी कामगारांसोबत चर्चा केली. हे कामगार रस्त्यावर वाढे विक्री करत होते. त्यांच्या तोंडाला मास्क आढळले नाही. रस्त्यावर वाढे विकू नका, तोंडाला मास्क लावा अशा सूचना त्यांनी ऊस तोडणी कामगारांना दिल्या.

माजी नगराध्यक्षांना फटकारले

जिल्हाधिकारी शासकीय विश्रामगृहात थांबलेले असताना याठिकाणी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विश्‍वास मुर्तडक आले. शहरातील बंद असलेले साईनाथ रुग्णालय सेंटर नागरिकांसाठी खुले करून द्यावे,अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली. जिल्हाधिकार्‍यांनी या मागणीकडे दुर्लक्ष करत हे रुग्णालय सुरू करता येणार नाही असे सांगितले यानंतरही मुर्तडक यांनी आपली मागणी लावून धरल्याने ‘तुम्ही रुग्णालय सुरू करता का?’ असे म्हणत जिल्हाधिकारी मार्गस्थ झाले. जिल्हाधिकार्‍यांनी मुर्तडक यांच्या सुचनेकडे दुर्लक्ष केल्याने तो चर्चेचा विषय बनला.

संगमनेर शहरात बेकायदेशीर कत्तलखाने मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत अनेकदा कारवाई करूनही कत्तलखाने बंद का केले जात नाही असा प्रश्‍न जिल्हाधिकार्‍यांंना विचारला असता बेकायदेशीर कत्तलखाने चालू ठेवणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले जे चुकीचे आहे ते चुकीचेच आहे. शहरातील कत्तलखाने बंद करण्याबाबत माहिती घेऊन आपण पोलिसांना तसे आदेश देऊ असे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यानंतर पोलिसांचा ताफा संगमनेर बस स्थानकावर आल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखांनी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना कत्तलखान्यांवर कारवाई करावी अशी सूचना केल्याचे समजले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com