अधिकारी नव्हे लोकशाहीचा नोकर होऊन काम करेल - विनायक नरवडे

अधिकारी नव्हे लोकशाहीचा नोकर होऊन काम करेल - विनायक नरवडे

भेंडा (वार्ताहर)

आयएएस अधिकारी म्हणण्याची पद्धत असली तरी सर्वप्रथम तो लोकशाहीचा नोकर असतो. त्यामुळे अधिकाऱ्यापेक्षा लोकशाहीचा नोकर होऊन लोकांची कामे करेल अशी ग्वाही केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत देशात 37 वे आलेले विनायक नरवडे यांनी केले.

तर आपण निवडलेल्या क्षेत्रात प्रामाणिकपणा ठेऊन परिश्रम केले तर कोणते ही यश आपल्या पासून दूर राहू शकत नाही असा विश्वास माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी व्यक्त केला.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था व जिजामाता विद्यालय माजी विद्यार्थी संघाचे संयुक्त विद्यमाने शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते नरवडे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, संचालक अड. देसाई देशमुख, काशीनाथ नवले, अशोकराव मिसाळ, बाजार समितीचे सभापती डॉ.शिवाजी शिंदे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रवींद्र मोटे, कामगार संचालक सुखदेव फुलारी, एकनाथ कोलते, आप्पासाहेब खरड, डॉ.कारभारी नरवडे, सौ.पुष्पा नरवडे, डॉ.जगन्नाथ नरवडे, रामकृष्ण नवले, अशोक वायकर, गणेश गव्हाणे, शंकर भारस्कर, संजय मनवेलीकर, डॉ.संतोष फुलारी, उपसरपंच दादा गजरे उपस्थित होते.

नरवडे पुढे म्हणाले, सरकार पूर्ण मदत व आयएएस पदावर सध्या कार्यरत असलेले अधिकारी सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी तयार आहेत. फक्त आपण अभ्यास करून आपल्याला सिद्ध केले पाहिजे. स्वतःमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. रोजचे पंधरा-सोळा तास अभ्यासाची तयारी ठेवा,मी हे करू शकतो असे स्वतःला प्रोत्साहित केले पाहिजे. जीवनात कधीही हताश होऊ नका. प्रामाणिक प्रयत्न केल्यावर परमेश्वराचा कृपाआर्शीवाद मिळतोच, यश प्राप्त होतेच. जीवनात खरे बोला, दररोज नवीन शिकत जा. मोठी स्वप्न पहा व कष्ट करून स्वप्न पूर्ण करा. अमेरीकेतून नोकरी सोडून जनसेवा व देशसेवेकरिता परत मायदेशी आलो. पुढील जीवन प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेसाठी असेल.

नरेंद्र घुले म्हणाले, जीवनात दररोज घडणाऱ्या लहान गोष्टी देखील आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतात, म्हणून 'पहा व शिका ' हा जीवनाचा मुलमंत्र असला पाहीजे. विदयार्थी जीवनात प्रामाणिक प्रयत्न केले व परीश्नम घेतले तर निश्चित केल्यास यश प्राप्त होते. गुणवत्तेला कार्यक्षमतेची जोड दया तसेच आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करावा.

अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात म्हणाले, घुले पाटील शिक्षण संस्थेचे अनेक विदयार्थी अनेक क्षेत्रात यशस्वी काम करत आहेत हे कौतुकास्पद आहे. या संस्थेचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतून अधिकारी व्हावे यासाठी त्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्याकरीत दरवर्षी एक लाख रुपये देण्याचे जाहीर केले.

Related Stories

No stories found.