होमिओपॅथी डॉक्टरांवरील अन्यायाला वाचा फोडणार

आमदार सुरेश धस यांचे आश्‍वासन
होमिओपॅथी डॉक्टरांवरील अन्यायाला वाचा फोडणार

अहमदनगर (प्रतिनिधी) -

राज्यातील 75 हजार होमिओपॅथी डॉक्टरांचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकारकडे कोणताही ठोस कृती आराखडा

नाही. होमिओपॅथी डॉक्टरांना त्यांचे अधिकार दिल्यास राज्यातील लाखो रुग्णांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे. सीसीएमपी उत्तीर्ण डॉक्टरांचे पाच वर्षांपासून प्रलंबित असलेले रजिस्टेशन देणे गरजेचे होते. मात्र, त्यासाठी सुद्धा शासन गंभीर नाही. ही बाब खरोखरच चिंताजनक आहे. यासंदर्भात राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना मी सक्रीय मदत करणार आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आ. सुरेश धस यांनी कृती समिती शिष्टमंडळास दिले.

राज्य होमिओपॅथी डॉक्टर्स कृती समितीच्यावतीने होमिओपॅथिक डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत आ. धस यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन केले होते. कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विजय पवार यांनी शासनस्तरावरील आवश्यक असलेली उपाय योजनांबाबत मत मांडले. राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांची पार्श्‍वभुमी कृती समितीचे मार्गदर्शक डॉ. प्रशांत शिंदे यांनी विषद केली. आ. धस यांनी राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांबाबत आश्‍वासक आणि आग्रही भुमिका मांडली. यासाठी सक्रीय मदत करण्याची ग्वाही तर दिलीच सोबत या प्रलंबित प्रश्‍नांबाबत शासन स्तरावरील होणार्‍या दिरंगाई बाबतही परखड मत व्यक्त केले.

यावेळी नगर कृती समितीचे जिल्हा संघटक डॉ. रणजीत सत्रे, जिल्हाध्यक्ष डॉ. विनय गरूड, डॉ. संजीव गडगे, शहर अध्यक्ष डॉ. किरण कर्डीले, शहर सचिव डॉ. दिपक कारखेले, जामखेड तालुकाध्यक्ष डॉ. भरत देवकर, आष्टीचे डॉ. दिपक भवर, डॉ. सुरेश हंबर्डे, डॉ. पी. डी. शिंदे, डॉ.अनिल जाचक, पाटोदा तालुका अध्यक्ष डॉ. रविंद्र राजपुरे, आष्टी तालुका संघटक डॉ. प्रविण धस, सचिव डॉ. गणेश पिसाळ, डॉ. सत्यवान सुरवसे, डॉ. अमिन शेख आदी डॉक्टर्स उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com