स्वच्छता कराचा घोटाळा झाला असेल तर ती रक्कम साई संस्थानकडे परत करा

शिवसेना नेते कमलाकर कोते यांची मागणी
स्वच्छता कराचा घोटाळा झाला असेल तर ती रक्कम साई संस्थानकडे परत करा

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी नगरपंचायतीला श्री साईबाबा संस्थानकडून दर महिन्याला स्वच्छता करापोटी 42 लाख 50 हजार रुपये देण्यात येत होते.

आता ऑक्टोबर 2020 पासून स्वच्छता करण्यासाठी शिर्डी नगरपंचायतीला फक्त 28 लाख रुपये खर्च येणार आहे. यास शिर्डी नगरपंचायतने मान्यता दिली आहे. दरम्यान 28 लाखांत जर स्वच्छता करत आहे तर मग येथून मागे तीन वर्ष संस्थानकडून सुमारे 42 लाख 50 हजार प्रती महिन्याप्रमाणे घेऊन यात मोठा घोटाळा केला, अशी खात्री शिर्डी ग्रामस्थ व शिवसैनिकांमध्ये निर्माण झाल्याची चर्चा असून या संदर्भात शिर्डी नगरपंचायतने स्पष्ट खुलासा करावा व या स्वच्छता कराचा घोटाळा झाला असेल तर त्याची रक्कम त्वरित साई संस्थानकडे परत करावी, अशी मागणी शिर्डी शिवसेना नेते कमलाकर कोते यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शिवसेना नेते कमलाकर कोते यांनी म्हटले आहे की, शिर्डी नगरपंचायतीने यापूर्वी शिर्डीत साईभक्त मोठ्या प्रमाणात येथे येतात म्हणून अस्वच्छता होत असल्याने स्वच्छता कर आकारणीसाठी स्वच्छताकर वसूल करणारे नाके उभारले होते, मात्र त्याचा साईभक्तांना मोठा फटका बसत होता.

याचा साईभक्तांना त्रास होऊ नये म्हणून साई संस्थानने नगरपंचायतशी चर्चा करून नगरपंचायतीच्या मागणीनुसार त्यांना स्वच्छताकर नाके बंद करून स्वच्छता करापोटी अनुदान म्हणून दर महिन्याला 42 लाख 50 हजार रुपये देण्याचे ठरवले व त्याप्रमाणे आतापर्यंत श्री साईबाबा संस्थान शिर्डी नगरपंचायतीला दर महिन्याला डिसेंबर 2017 पासून हे पैसे स्वच्छता करापोटी अनुदान देत होती.

मात्र नगरपंचायतीने श्री साईबाबा संस्थानकडून 42 लाख 50 हजार रुपये घेऊन बीव्हीजी कंपनीला पाच वर्षांसाठी स्वच्छतेचा ठेका दिला होता, बीव्हीजी कंपनीचे ठेकेदार स्वच्छता कर्मचारी हे शहरात स्वच्छतेचे काम करत होते, मात्र करोनाच्या या काळात श्री साईबाबा मंदिर बंद असल्यामुळे, साईभक्त येणे बंद झाल्याने संस्थानला देणगीचा ओघ कमी झाला त्यामुळे संस्थान शिर्डी नगरपंचायतला गेले.

काही महिन्यांपासून स्वच्छता कराचे अनुदान दिलेले नाही. संस्थान मागील तीन वर्षांपासून 42 लाख पन्नास हजार रुपये स्वच्छता करापोटी अनुदान म्हणून देत आली आहे. यापुढे दर महिन्याला फक्त 28 लाख रुपये स्वच्छता खर्च येणार आहे. या स्वच्छता करापोटी मिळणार्‍या अनुदानातील पैशामध्ये गफला झाला असून याची सर्व चौकशी उच्चस्तरीय पातळीवर व्हावी, व तसे झाले असेल तर त्याचे पैसेही श्रीसाईबाबा संस्थानला परत देण्यात यावेत, कारण हा पैसा साईभक्तांचा पैसा आहे, साईभक्तांनी देणगी दिलेल्या पैशातून नगरपंचायत पैसे देत होती, जर ह्या पैशात काही घोटाळा झाला असेल तर ते साईबाबांचे पैसे म्हणून शिर्डी नगरपंचायतीने संस्थांनला परत करावे.

शिर्डी नगरपंचायतमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांनी अनेकदा हा विषय मांडला आहे, अनेकदा त्या विरोधात शिवसेनेने आवाज उठवला होता, मात्र शिर्डी सत्ताधारी गटाने आपला मनमानी कारभार सुरू ठेवला. या स्वच्छता कराची अधिक घेतलेली रक्कम कुठे गेली ? याचा खुलासा सत्ताधारी गटाने करावा,अशी मागणी शिवसेनेचे नेते कमलाकर कोते यांनी या पत्रकाद्वारे केली आहे.

या पत्रकावर शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अनिताताई जगताप, शिवसेना तालुका प्रमुख संजय शिंदे, शिर्डी शहरप्रमुख सचिन कोते, उपतालुका प्रमुख अक्षय तळेकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख कस्तुरीताई मुदलियार, तालुका संघटक स्वातीताई परदेशी, शिर्डी शहरप्रमुख लक्ष्मीताई आसने, राहुल गोंदकर, जयराम कांदळकर आदींची नावे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com