स्वच्छता सर्वेक्षणात नगर शहर देशात 40 व्या तर राज्यात 12 व्या स्थानावर
सार्वमत

स्वच्छता सर्वेक्षणात नगर शहर देशात 40 व्या तर राज्यात 12 व्या स्थानावर

मनपाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत कचरा मुक्त शहरांमध्ये थ्री स्टार मानांकन मिळाल्यानंतर नगर महापालिकेच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. स्वच्छ भारत अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात नगर शहर देशात 40 व्या आणि राज्यात 12 व्या स्थानावर आहे.

नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यात झालेल्या सर्वेक्षणात महापालिकेने मोठी तयारी केली होती. घर ते घर कचरा संकलन करण्यात आले. जमा केलेल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी विविध प्रकल्पांची उभारणी महापालिकेकडून करण्यात आली. शहर स्वच्छतेच्या उपाययोजनांसाठी महापौरांसह सर्व पदाधिकारी, जिल्हाधिकारी, आयुक्तांसह सर्व अधिकारी व कर्मचारी दिवस- रात्र झटत होते.

नागरिकांमध्ये करण्यात आलेली जनजागृती, कर्मचार्‍यांकडून दिवस व रात्र अशा दोन वेळेस झालेली साफसफाई व कचराकुंडी मुक्त शहर करण्यात आल्यामुळे नगर शहरास स्टार मूल्यांकन (जीएफसी) थ्री स्टार रँकिंग मिळाले. त्या पाठोपाठ सामुदायिक व सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था, सेप्टिक टँकमधून उपासण्यात आलेल्या मैल्याची विल्हेवाट लावण्यासाठी एफएसटीपी प्रकल्प अवघ्या दोन महिन्यांत उभारण्यात आला.

त्यामुळे शहराला ओडीएफ++ चा दर्जा मिळाला. नागरिकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रीयांमुळे गुणांकनात वाढ झाली. 6 हजार गुणापैकी नगर शहराला 4 हजार 147 गुण मिळाले आहेत.

देशात 40 वा तर राज्यात 12 वा क्रमांक मिळाला आहे. यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, तत्कालीन आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त सुनील पवार, प्रदीप पठारे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्यासह सर्व पदाधिकारी, अधिकारी, विभाग प्रमुख, प्रभाग अधिकारी व स्वच्छता कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com