हैद्राबाद ग्रीनफिल्ड एक्सप्रेस महामार्गाच्या भूमापन प्रक्रियेस सुरूवात

हैद्राबाद ग्रीनफिल्ड एक्सप्रेस महामार्गाच्या भूमापन प्रक्रियेस सुरूवात

उंबरे |वार्ताहर| Umbare

सुरत-हैद्राबाद ग्रीनफिल्ड एक्सप्रेस महामार्गाच्या भूमापन प्रक्रियेस राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांचा विरोध लक्षात घेऊन काल प्रशासनाने पोलीस संरक्षणात भूमापन प्रक्रियेस सुरूवात केली. मात्र, शेतकरी आपल्या मागण्यावर ठाम असल्याने श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी अनिल पवार व राहुरीचे तहसीलदार फसियोद्दिन शेख व पो.नि. प्रताप दराडे यांनी प्रत्यक्ष जाऊन शेतकर्‍यांशी चर्चा करून भूमापनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केेले. यावेळी शेतकर्‍यांची आलेल्या आधिकार्‍यांशी झालेल्या सकारात्मक चर्चा होऊन भूमापनास राहुरी तालुक्यातील खडांबे येथून सुरूवात झाली.

दरम्यान, सुरत-हैद्राबाद ग्रीनफिल्ड च्या भूमापन प्रक्रियेस खडांबे खुर्द येथील शेतकर्‍यांनी केला कडाडून विरोध करून आधी मोबदला जाहीर करून इतरही रास्त मागण्यांचा विचार करावा असा आक्रमक पवित्रा घेतला होता.

केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी आणि भारतमाला प्रकल्पातील नव्याने होऊ घातलेल्या सुरत-हैद्राबाद ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे या महामार्गाच्या जमीन मोजणी प्रक्रिया करीता शेतकर्‍यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. दि. 15 सप्टेंबर 2021 रोजी सडे- वांबोरी रोडवरील सडे रेल्वेचौकी जवळील खडांबे नाका येथे खडांबे खुर्द, खडांबे बुद्रुक, सडे, वांबोरी या गावांतील शेतकरी आणि महिला या मोजणी प्रक्रियेला विरोध करून अधिकार्‍यांना मोजणीसाठी मज्जाव केला होता.

यावेळी अधिकार्‍यांकडे शेतकर्‍यांनी मागणी केली की, बहुतांश बाधित शेतकरी हे अल्पभुधारक असून रस्त्यात जमिनी गेल्यास शेतकरी भूमिहीन होइल. तसेच गावात प्रदूषण होऊन इतर शेती देखील नापीक होईल. गावातील सर्व शेतकरी व त्यांचे कुटुंबाची उपजीविका ही शेतीवर अवलंबून असल्याने त्यांच्यावर शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ येऊन शेतकरी देशोधडीला लागेल.

तसेच शासनाने तीन वर्षांवरील खरेदी-विक्री व्यवहाराची सरासरी काढून मोबदला देण्याच्या निर्णयावर शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त करत या मोजणी प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शवीला आणि मोजणी करणार्‍याकरिता आलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांना मोकळ्या हाताने मागे पाठविले होेते. परंतु, काल प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या शिष्टाईने ही मोजणी प्रक्रिया पुन्हा सुरळीत करण्यात आली.

मी सर्व शेतकर्‍यांना विनंती करतो की, सुरत- हैद्राबाद ग्रीनफिल्डच्या भूमापन प्रक्रियेस यापुर्वी जिल्हाधिकारी व माझ्यासोबत दोन वेळेस शेतकर्‍यांसमवेत बैठक घेण्यात आली होती. काल समक्ष जागेवर जाऊन शेतकरी बांधवांशी चर्चा केली की जे प्रश्न सरकारच्या स्तरावर सोडविले जातील ते प्रश्न शासन दरबारी आम्ही निश्चितच पाठविणार आहोत.

- अनिल पवार, प्रांताधिकारी, श्रीरामपूर

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com