संकरीत गाईच्या माध्यमातून थारपारकर जातीच्या कालवडीचा जन्म

भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाद्वारे यश
संकरीत गाईच्या माध्यमातून थारपारकर जातीच्या कालवडीचा जन्म

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कृषी महाविद्यालय पुणे येथे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी विद्यापीठामध्ये पहिल्यांदाच थारपारकर जातीच्या कालवडीचा जन्म संकरीत गाईच्या माध्यमातून झाला आहे, अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी दिली.

प्रयोगशाळेमध्ये थारपारकर 133 नंबरची दातागाय वापरली असून तिची दूध उत्पादन क्षमता प्रतिवेत 3293 किलो आहे. तसेच दाता वळू म्हणून थारपारकर फेथफुल नावाचा वळू वापरला असून वळूच्या आईचे दूध उत्पादन प्रतिवेत 3005 किलो आहे व दुधातील स्निग्धांश 4.8% आहे. हा भ्रूण प्रयोगशाळेतून तयार करून सात दिवसानंतर देशी गाई संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये असलेल्या पीटी 80 या संकरित गायीमध्ये प्रत्यारोपण केला आहे.

प्रत्यारोपण दिनांक 22 ऑक्टोबर 2022 असून गाय 17 जुलै 2023 रोजी व्याली आहे. वासराचे जन्मतः वजन 21 किलो आहे.सदर प्रकल्प महाराष्ट्र शासनाने सन 2020-2024 या कालावधीसाठी मंजूर केला असून उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून सदर प्रकल्प साकारला आहे.

महाराष्ट्र शासनाने देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर व शेतकर्‍यांच्या गोठ्यामध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान प्रायोगिक तत्वावरती वापरण्यास सुरुवात केली असून या प्रकल्पांतर्गत सुमारे 150 पेक्षा जास्त साहिवाल, गीर, राठी, थारपारकर व लाल सिंधी जातीच्या वासरांचा जन्म होणार आहे, अशी माहिती प्रकल्पाचे तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कणखरे यांनी दिली. सदर तंत्रज्ञान राहुरी सीमेन स्टेशन (एनडीडीबी) यांच्या मार्फत राबविण्यात येत असून उच्च वंशावळीच्या देशी गोवंशाची संख्या वाढवण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे. सदर प्रकल्प यशस्वी होण्यासाठी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने, तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कणखरे, डॉ. विष्णू नरवडे, डॉ. प्रमोद साखरे तसेच राहुरी सीमेन स्टेशनचे डॉ. शिवकुमार पाटील हे काम करत आहेत.

सदर प्रकल्प महाराष्ट्रातील गोपालकांसाठी अत्यंत महत्वाचा असून देशी गाईंच्या दूध उत्पादन क्षमतेचा तुलनात्मक अभ्यास या संशोधन केंद्रामध्ये होत आहे. सदर प्रकल्प महाराष्ट्र शासनाने सन 2020-2024 या कालावधीसाठी मंजूर केला असून उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित पवार यांच्या प्रयत्नातून सदर प्रकल्प साकारला आहे. मे 2022 रोजी या संशोधन केंद्रावर देशी गाईंचे गोधन 2022 हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यादरम्यान ना. अजित पवार यांनी देशी गाईवरती संशोधन होण्यासाठी व शेतकर्‍यांना तांत्रिकदृष्ट्या निवासी प्रशिक्षण मिळण्यासाठी मोठ्या निधीची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे विद्यापीठ पुढील कार्यासाठी निधीच्या प्रतिक्षेत आहे.

डॉ. पी.जी. पाटील, कुलगुरु, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com