पतीने पत्नीकडे नांदायला जावे

नगर वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचा निकाल
पतीने पत्नीकडे नांदायला जावे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पती-पत्नीचे वादावर येथील वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने एक ऐतिहासिक आणि वेगळा निकाल दिला आहे. पतीने पत्नीविरोधात तक्रार दाखल केली होती. यावर तक्रारदार पतीनेच पत्नीकडे राहयला (नांदायला) जावे, असा न्यायालयाने निकाल दिला आहे.

विवाहनंतर मुलगी सासरी म्हणजेच मुलाच्या घरी नांदायला जाते. ही तशी समाज रूढ पध्दत आहे. याच पध्दतीला छेद देणारा हा निकाल आहे. वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश एस. एस. पारवे यांनी हा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा आधार घेत दिला आहे. वकील भगवान कुंभकर्ण आणि वकील शिवाजी सांगळे यांनी विवाहित महिलेच्या बाजूने न्यायालयात युक्तिवाद करत बाजू मांडली आहे.

पती-पत्नी दोघे उच्च विद्याविभूषित. एक जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात, तर दुसरा राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात नोकरीला. या दोघांचा विवाह ऑगस्ट 2014 मध्ये झाला. विवाहच्या दोन वर्षानंतर या दोघांना एक मुल झाले. कालानंतराने दोघांमध्ये वाद सुरू झाल्याने पत्नी नोकरीच्या ठिकाणी राहू लागली. यानंतर पतीने पत्नीला जुलै 2018 मध्ये परस्पर संमतीने घटस्फोटासाठी नोटीस पाठवून दिली. यावर न्यायालयात वाद सुरू झाले. पत्नीने वकीलामार्फत न्यायालयात बाजू मांडली. सासरच्याकडून होत असलेल्या छळाचे कथन केले. नोकरीच्या ठिकाणी पतीला बोलावले. संसारसुखाची मागणी केली. आणि पतीने दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज नामंजूर करण्याची मागणी केली.

न्यायालयाने दोन्ही बाजूचे अवलोकन केले. सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकरणांमध्ये दिलेल्या निकालांचा आधार घेतला. पती-पत्नीने एकमेकांवर केलेले आरोप फेटाळून लावले. दोघे संबंध पुर्नस्थापित होण्यास पात्र असल्याचे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. यानुसार पतीने दोन महिन्याच्या आत वैवाहिक संबंध पुर्नस्थापित करावेत, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

लग्नानंतर मुलगी ही मुलाकडे, म्हणजेच सासरी नांदायला जाते, अशी समाज परंपरा आहे. आधुनिक काळात तसेच समान नागरी कायद्याचे अवलोकन केल्यास कायद्यासमोर सर्व समान आहे. त्यामुळे कोणतीही परंपरा कायद्यापेक्षा मोठी ठरत नाही. वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने दिलेला हा निकाल तसाच आहे. महिलांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा, विचारांना बळ देणारा हा निकाल आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

- अ‍ॅड. भगवान कुंभकर्ण

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com