माहेरून पैसे न आणल्याने पत्नीचा खून

पतीस अटक
माहेरून पैसे न आणल्याने पत्नीचा खून

आश्‍वी (वार्ताहर) -

संगमनेर तालुक्यातील पूर्व भागाकडील असणार्‍या पानोडी गावातील माहेरवरून गाय, गाडी व उसनवारी मिटविण्याकरिता पैसे आणावेत

यासह किरकोळ कारणावरून पती व पत्नीत झालेल्या वादातून पतीने 33 वर्षीय पत्नीच्या डोक्यात लोखंडी हत्याराने घाव घालून हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याने या घटनेबाबत लोकांमधून हळहळ व्यक्त होत असून मयत विवाहितेवर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात अंत्यविधी करण्यात आला.

मयत विवाहितेचा भाऊ ज्ञानेश्वर जगन्नाथ मोहीम याने आश्वी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पानोडी येथील शंकर कारभारी दिघे यांच्या सोमनाथ नावाच्या मुलाबरोबर जामगाव (गंगापूर) येथील जगन्नाथ मोहीम यांची मुलगी अनिता उर्फ ज्योती हिचे 16 वर्षांपूर्वी थाटामाटात लग्न झाले. सुरुवातीला 3 ते 4 वर्षे दोघांचा संसार सुरळीत चालू होता. मात्र त्यानंतर गाय घेण्यासाठी पहिल्यांदा सोमनाथ दिघे याने पैशाची मागणी केली.

मात्र वडीलांची गरिबीची परिस्थिती असतानाही मुलीच्या संसारास कमतरता निर्माण होऊ नये म्हणून तडजोड करत गाय पानोडी येथे पोहच करण्यात आली मात्र यामुळे सोमनाथची अपेक्षा वाढू लागली त्यानंतर नविन मोटर सायकल घेण्यास पैशाची मागणी झाली.

तीही पूर्ण करण्यात आल्यानेचं घटनेच्या महहिन्यापूर्वीचं उसनवारी, कर्ज मिटविण्याकरिता 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती मात्र ही मागणी पूर्ण करता आली नाही त्याचा राग धरुन सोमनाथ याने ज्योतीस मानसिक व शारिरिक छळ करण्यास सुरुवात केली. काही काम करत नाही निसत्या झोपा काढते असा शाब्दीक छळ सुरु झाला.

घटनेच्या आदल्या रात्री गहू या पिकाला पहाटे 6 वाजेपर्यंत पाणी भरले. रात्रभर जागरण झाल्याने सकाळी ज्योती हीस झोप लागली ते बघून तू काही कामाची नाही निसत्या झोपा काढते, या कटकटीतून वाद निर्माण झाला हा वाद एवढा विकोपास गेला की रागाच्या भरात सोमनाथ याने हातात लोखंडी हत्यार पत्नीच्या डोक्यासह कानाच्या मागे, पाठीवर, छातीवर मारले. या जोरदार घावामुळे ज्योती ही जागेवर कोसळली. ही घटना शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. ही वार्ता शेजार्‍यापर्यंत पोहचली.

शेजार्‍यांनी ज्योतीस लोणी येथील प्रवरा ग्रामिण रुग्णालयात दाखल केले मात्र त्यास विलंब झाल्याने डॉक्टरांनी तीस मृत घोषित केले. ही वार्ता माहेरकडील लोकांना समजल्यानंतर त्यांनी ही घटना हत्याची असून पोलिस नोंद होणे महत्वाचे असून आरोपीसह सासरकडील मंडळींना त्वरीत अटक करावी अशी आक्रमक मागणी केली.

घटनेची माहिती मिळताच संगमनेरचे पोलिस उपअधिक्षक राहुल मदने, आश्वी पोलिस स्टेशन पोलिस निरिक्षक सुधाकर मांडवकर, पोलीस हेड कॉ. वाघमारे, पोलीस कॉ. विनोद गंभीरे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. पती, सासू-सासरे यांना ताब्यात घेतले मात्र या घडामोडीस उशिर झाल्याने रविवारी दुपारी मृत ज्योती हीचा पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी करण्यात आला.

ज्ञानेश्‍वर मोहीम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आश्‍वी पोलीस ठाण्यात आरोपी सोमनाथ शंकर दिघे याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 27/2021 भारतीय दंड संहिता कलम 302 अन्वये दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. पाटील करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com