
उंबरे |वार्ताहर| Umbare
राहुरी तालुक्यातील कात्रड येथे कौटुंबिक वादातून पत्नी आणि सासूची हत्या करून पसार झालेल्या पतीनेही नगर एमआयडीसी परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी नूतन सागर साबळे (वय 23) तर सासु सुरेखा दिलीप दांगट (वय 45), सागर सुरेश साबळे (वय 36) अशी मयतांची नावे आहेत. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कात्रड गावामध्ये मंगळवार 15 ऑगस्ट रोजी अमावस्येच्या रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान धक्कादायक घटना घडली. सागर सुरेश साबळे याने आपल्या राहत्या (सासुरवाडीतील) घरात पत्नी आणि सासू झोपेत असतानाच डोक्यावर लोखंडी पहारीने घाव घालून ही हत्या केली असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाला होता. मात्र त्यानेही काल एमआयडीसी परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कात्रड येथे मयत सुरेखा दिलीप दांगट व तिची मुलगी नूतन सागर साबळे तसेच जावई सागर सुरेश साबळे व सुरेशला असणारी दीड वर्षाची मुलगी हे मुलीची आई सुरेखा दांगट यांच्या वस्तीवर घरजावई म्हणून राहत होते.
मंगळवारी 15 ऑगस्ट अमावस्येच्या दिवशी रोजी रात्री अकराच्या दरम्यान सासू सुरेखा दांगट व पत्नी नूतन साबळे या गाढ झोपेत असतानाच आरोपी सागर साबळे याने सासूच्या डोक्यात लोखंडी पारीने वार केला तसेच पत्नीच्याही डोक्यात वार केल्यामुळे त्या दोघीही जागीच गतप्राण झाल्या. या परिस्थितीत सागर साबळे याने सासू व पत्नीला जागीच ठार केल्यानंतर आपली दीड वर्षाची चिमुकली हिला बरोबर घेऊन आपली आई व भाऊ गणेश हे कात्रडगाव मध्येच राहत आहेत. त्या मुलीला साडेअकरा ते बाराच्या दरम्यान आपल्या आईकडे घेऊन गेले व आईला म्हणाला मुलीला तुझ्याकडे राहू दे मी लघुशंकेला जाऊन येतो असे सांगून सागर तिथुन पसार झाला.
तो परत येईना म्हणून त्याच्या आईला शंका आली व तिने आपला मुलगा गणेश व त्याच्या पत्नीला सागरने मुलीला इथे ठेवून गेला अशी कल्पना दिली असता सागरचा भाऊ गणेश व त्याची पत्नी थेट सागर ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी गेले असता त्यांनी घरात पाहिले तर सुरेखा दांगट व नूतन साबळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. हे बघून गणेश व त्याची पत्नी घाबरून गेले. अशा परिस्थितीमध्ये गणेशच्या पत्नीला त्या ठिकाणी चक्करही आली. तरीही गणेशने हिम्मत धरून वांबोरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. अशा परिस्थितीमध्ये गणेश याने ताबडतोब राहुरी पोलीस स्टेशन गाठले. ही सर्व घटनेची कल्पना दिली. त्यावेळेस दोन वाजले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीसांचा फौजफाटा घटनास्थळी तीन वाजता पोहोचला. सर्व घटनेची माहिती समजताच श्रीरामपूर व नगर इथून तातडीने पथके घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी सर्व पहाणी केले असता मयत सुरेखा व नूतन यांच्या डोक्यात वार केलेली लोखंडी पहार दुसर्या खोलीत कॉटखाली आढळून आली.
मयत नूतन साबळे हिचा 2021 आली विवाह झालेला होता तिला एक दीड वर्षाची मुलगी आहे. सागर सुरेश साबळे हा नगर एमआयडीसी मध्ये नोकरीला जात असल्याचे समजते. मयत सुरेखा दांगट ही आपले पती दिलीप दांगट यांच्यापासून गेल्या सात ते आठ वर्षांपासून विभक्त राहत असल्याचे माहिती मिळाली आहे. सुरेखा दांगट हिचे माहेर करजगाव येथील आहे. दोन्ही मृतदेह नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेले असून घटनास्थळी उप विभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, सहायक पोलीस निरीक्षक राजु लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक चारूदत्त खोंडे, सहाय्यक फौजदार चंद्रकांत बराटे, पो कॉ ए. एस. पालवे, अंकुश भोसले हे तात्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी पोहचले. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली मात्र, आरोपी सागर साबळे याने नगर एमआयडीसी परिसरात एका चिंचेच्या झाडाला ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपविली. काल दुपारच्या सुमारास नगर एमआयडीसी पोलीस हद्दीत सागर साबळेचा मृतदेह आढळून आला. दरम्यान काल दुपारी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी कात्रड येथे. घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना. यामहिन्याचा शेवटचा दिवस असल्याने सुरेखा दांगट यांनी जावई व नातेवाईकांसाठी 15 ऑगस्ट रोजी धोंड्याचा कार्यक्रम ठेवला होता. परंतु या जेवणासाठी जावई सागर साबळे हा उपस्थित नसल्याने नातेवाईकांमध्ये चर्चा सुरू होती. तसेच मयत नूतन साबळे ही चार महिन्यांची गरोदर होती. त्यापूर्वी तिला दीड वर्षाची मुलगी आहे. या घटनेमुळे कात्रड परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.