
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
बचत गटातील महिलांना शिर्डीला नेल्याच्या रागातून दोघांनी एका महिलेसोबत गैरवर्तन केले. तिच्या पतीला लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांच्या दुकानाच्या दरवाजाचा व काऊंटरच्या काचा फोडून नुकसान केले. नगर तालुक्यातील एका गावात शनिवारी (दि. 29) दुपारी ही घटना घडली आहे.
याप्रकरणी पीडित महिलेने सायंकाळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बाबु काळे व सुनील काळे (दोघांची पूर्ण नावे माहिती नाही, रा. वाकोडी फाटा ता. नगर) यांच्या विरूध्द विनयभंग, मारहाण आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला व तिचा पती रविवारी दुपारी त्यांच्या दुकानात असताना बाबु काळे व सुनील काळे तेथे आले.
बचत गटातील महिलांना शिर्डीला का नेले, असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ केले. तिच्या पतीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. फिर्यादीच्या हाताला धरून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत दुकानातून बाहेर काढून दिले. दुकानाच्या दरवाजाचा व काऊंटरच्या काचा फोडून नुकसान केले. धक्काबुक्की करून तुम्हाला काय करायचे ते करा, आम्ही तुम्हाला पाहून घेऊ, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.