राहुरी तालुक्यात वादळवार्‍याचा फळबागांना फटका

चारापिके जमीनदोस्त
राहुरी तालुक्यात वादळवार्‍याचा फळबागांना फटका

देवळाली प्रवरा (वार्ताहर) - रविवारी रात्रीपासून सोसाट्याचा वारा सुरु झाल्याने काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. तर काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडीत झाला आहे. आंबा व जांभूळ फळांना वादळाचा जास्त फटका बसला. त्यामुळे राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

हवामान विभागाने अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे अरबी समुद्रात कमीदाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्यौत्के चक्रीवादळ तयार झाले आहे. या वादळाचा वेग प्रचंड असल्याने याचा फटका शेतकरी बांधवांना बसण्याची शक्यता हवामान विभागाने दोन दिवस अगोदर व्यक्त केली होती. त्याप्रमाणे रविवारी रात्री आठवाजेच्या सुमारास प्रचंड वादळीवार्‍यासह पावसाने हजेरी लावली . अचानक सरु झालेल्या वादळाने अनेकांची तारांबळ उडाली. पाऊस थांबल्यानंतर वादळीवार्‍याचे तांडव रात्रभर सुरु होते.

त्यानंतर काल सोमवारी सकाळपासून वादळीवारा व पावसाचा अधूनमधून शिडकाव दिवसभर सुरु होता. वार्‍याचा वेग प्रचंड असल्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. सध्या आंबा व जांभूळ या फळांचा हंगाम सुरु आहे. या वादळाचा फळपिकांना जास्त फटका बसला. वादळाचा वेग प्रचंड असल्याने आंब्याची फळ जमिनीवर तुटून पडल्याने आंब्याच्या झाडाखाली कैर्‍यांचा सडा पडला. हीच परिस्थिती जांभूळ फळाची झाली. एप्रिल व मे महिन्यात जांभळाच्या झाडांना मोठ्या प्रमाणात बहर येतो. मे महिन्याच्या अखेरीस जांभळ काढण्यास येतात. परंतु वादळाने हा बहर गळून गेला असून झाडाच्या फांद्या मोडल्याने जांभूळ व आंबा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतात उभी असणारी चारा पिके घास, मका, गिन्नीगवत ही वादळाने आडवी झाली आहेत. पाऊस नाही फक्त प्रचंड वारा असल्याने कांदाचाळीवर बांधलेले प्लास्टिक बारदाने उडून गेले. वार्‍याचा वेग प्रचंड असल्याने शेतात व वाड्यावस्त्यावर भितीदायक वातावरण तयार झाले होते. आधीच करोना त्यात हे अस्मानी संकट यामुळे बळीराजा हबकून गेला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com