मुळा डॅममधील मोटारी बिघडतात कशा?

शहर पाणी पुरवठ्याच्या विस्कळीतपणावर सभापती संतापले । सोमवारी बैठकीचे आयोजन
मुळा डॅममधील मोटारी बिघडतात कशा?

अहमदनगर (प्रतिनिधी) - नगर शहराला पाणी पुरवठ्यासाठी मुळा धरणात बसविलेल्या दोन मोटारी दर महिन्याला बिघडतात कशा? असा सवाल करत स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी प्रशासन आणि ठेकेदाराच्या गलथानपणावर बोट ठेवले आहे. या संदर्भात सभापती घुले यांनी सोमवारी बैठक बोलविली आहे.

उपसा सुरूळीत होईल, हा त्यामागील उद्देश. राखीव असलेली मोटार कायम नादुरूस्त असते. ती कधी दुरूस्तच केली जात नाही. त्यामुळे बिघडलेली मोटार दुरूस्त करून मगच शहराला पाणी मिळते. ती मोटार दुरूस्तीपर्यंत पाणी पुरवठा विस्कळीत होतो. वास्तविक राखीव मोटार दुरूस्त असती तर ती बसून पाणी पुरवठा सुरळीत ठेवणे शक्य आहे.

पण हे काम कोणी करतच नाही. राखीव असलेली 725 हॉर्सपॉवरची मोटार चालू की बंद हे पाहण्याची जबाबदारी ही ठेकेदाराची की महापालिका प्रशासनाची, या वादात नगरकर वेठीस धरले जात आहेत. दर महिन्याला पाणी उपसा करणार्‍या मोटारी बिघडतात तरी कशा? असा सवाल करत आता सभापती घुले त्याचा शोध घेणार आहेत. त्यासाठीच त्यांनी सोमवारी महापालिका अधिकारी, ठेकेदारांच्या सोबत बैठकीचे आयोजन केले आहे.

आपत्ती सोडा, हे तर वेगळेच

वादळात झाडे उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडीत होणे, वीज वाहक तारा तुटणे या नैसर्गिक आपत्तीमुळे शहराचा पाणी पुरवठा खंडीत होतो, हे नगरकर समजू शकतात. मात्र सत्य परिस्थिती वेगळीच आहे. दर महिन्याला पाणी उपसा करणारी मोटार ना दुरूस्त झाल्याचे कारण सांगत पाणी पुरवठा विस्कळीत होतो. स्टॅन्डबाय मोटार कायम ना दुरूस्त. हा प्रशासनाचा गलथानपणा आहे. वापरातील मोटार बिघडली तर स्टॅन्डबाय मोटार बसून काही मिनिटात पाणी पुरवठा सुरळीत करणे शक्य आहे. मात्र हे काम प्रशासन करत नाही, अन् ठेकेदारही नाही. आता ती गोम सभापती घुले यांनी शोधली असून सोमवारच्या बैठकीत त्याची झाडाझडती घेतली जाणार आहे.

धरणात पाणी उपसा करणार्‍या मोटारीची देखभाल दुरूस्ती ठेकेदाराकडे की प्रशासनाकडे याचा शोध घेवू. स्टॅन्डबाय मोटार दुरूस्ती का करत नाहीत. दर महिन्याला 725 हॉर्सपॉवरच्या मोटारी बिघडतात कसं काय?, हा सगळा सावळा गोंधळ असून त्यावर बैठकीतून मार्ग काढला जाईल.

- अविनाश घुले, सभापती, स्थायी समिती

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com