नगरमध्ये भरदिवसा घरफोडी

तीन लाखांचा मुद्देमाल लंपास : कायनेटीक चौकात कार्यालय फोडले
नगरमध्ये भरदिवसा घरफोडी

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - शहरातील स्टेशनरोड येथील संतोषीमाता कॉलनीमध्ये चोरट्यांनी घरफोडून 40 हजार रूपयांची रोख रक्कम, दोन लाख 46 हजार रूपयांचे सोन्याचे दागिणे असा दोन लाख 87 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. तसेच कायनेटीक चौकातील रविष कॉलनीत खाजगी कार्यालय फोडून चारशे रूपयांची रोख रक्कम चोरली. या दोन्ही घटना मंगळवारी दुपारी घडल्या. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे घरफोडीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

मंगळवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान संतोषीमाता कॉलनीमधील गणेश रामदास लालबागे (वय 31) यांच्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील सामानांची उचकापाचक केली. या सामानामध्ये चोरट्यांच्या हाताला 40 हजार रूपयांची रोख रक्कम, घड्याळ, सोन्याचे दागिणे लागले. त्यांनी सर्व मुद्देमाल लंपास केला असल्याचे लालबागे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

घटनास्थळी शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दुर्गे करीत आहे. चोरट्यांनी मंगळवारी दुपारी साडेअकरा ते दीड वाजेच्या दरम्यान बांधकाम व्यवसायिक किशोर जवाहरलाल मुनोत (वय 50) यांचे कायनेटीक चौकातील रविष कॉलनीत असलेले कार्यालय फोडले. याठिकाणी चोरट्यांच्या हाती फक्त चारशे रूपयांची रक्कम लागली. याप्रकरणी मुनोत यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार ढगे करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com